तुम्ही सातबारा उताऱ्यावर काही फेरफार केली आहे ? तुमच्या मालमत्ता पत्रिकेवर फेरफार नोंदवण्यासाठी अर्ज केलाय? तुमचे हे प्रकरण रखडले आहे का ? थांबा, आता तुम्हाला याबाबत कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुमच्या प्रकरणाचे ट्रॅकिंग आता ऑनलाइन करता येणार आहे. एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे हे प्रकरण प्रलंबित असल्यास ते तुम्हाला ऑनलाइनच कळणार आहे. याबाबत तुम्ही संबंधिताला प्रकरण का अडकले याविषयी विचारणा करू शकता.
"आपली चावडी' या भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर आता ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातून सातबारा उतारा, मिळकत पत्रिका तसेच मोजणीच्या प्रकरणांमधील प्रलंबितता दिवस कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी हे पाऊल उचलले आहे.
सातबारा उतारा किंवा मिळकत पत्रिकेत फेरफार केल्यानंतर त्याला मान्यता मिळून सुधारित सातबारा किंवा मिळकत पत्रिका आपल्या हातात येईपर्यंत या प्रकरणाची विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जाते. त्यानंतर त्याला मान्यता मिळते.
ही ऑनलाइन सुविधा आहे. अर्जदाराला घरबसल्याच आपल्या प्रकरणाचे ट्रॅकिंग करता येणार आहे. सध्या सातबारा व मिळकत पत्रिकेतील फेरफार नोंदी संदर्भातील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच जमीन मोजणी प्रक्रियेतील सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपले प्रकरण नेमके कोणत्या टेबलावर किती दिवस रखडले। याची माहिती सामान्यांना मिळाल्यानंतर तो संबंधिताला याविषयी विचारणा करू शकेल. यामुळे सामान्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. - निरंजन कुमार सुधांशू, संचालक, भूमी अभिलेख व आयुक्त, जमाबंदी विभाग, पुणे
एखादे प्रकरण कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे, हे केवळ वरिष्ठ अधिकारी यांनाच कळू शकत होते. मात्र, आता भूमी अभिलेख संचालक व जमाबंदी आयुक्त निरंजन कुमार सुधांशू यांनी ही सुविधा सामान्यांसाठीही उपलब्ध करून दिली आहे. मात्र, एकदा फेरफार केल्यानंतर ते किती दिवसांत मिळू शकेल याची माहिती सामान्यांना नसते. यापूर्वी 'आपली चावडी' या संकेतस्थळावर दिली आहे.
प्रलंबितता कमी होणार
सध्या पुणे विभागात अशा फेरफार नोंदीची सरासरी दिवसांची संख्या २६ इतकी आहे. तर कोकण विभागात मात्र यासाठी ३१ दिवस लागतात. अमरावती विभागात २० दिवसांतच फेरफार नोंद पूर्ण होते. या ऑनलाइन सुविधेमुळे फेरफार नोंदीची सरासरी दिवसांची संख्या कमी होऊन या प्रक्रियेला कमी दिवसांत पूर्ण करता येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता यातून वाढीस लागणार आहे.
तुम्हाला डावलले का ? हे कळेल
■ सातबारा उताच्यातील फेरफार नोंद केल्यानंतर त्या संदर्भातील नोटीस काढणे, हरकतीची तारीख निश्चित करणे, हरकती आल्याची नोंद करणे व संबंधिताने त्यावर सुनावणी घेऊन त्याला मान्यता देणे अशा टप्प्यांमधून हे प्रकरण जाते.
■ या प्रकरणाचा प्रवास आता तारखे नुसार संकेतस्थळावर दिसणार आहे. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने काय कार्यवाही केली. हे देखील दिसून येईल, त्या दिवशी किती प्रकरणे आली, त्यावर संबंधितांनी काय नेमका निर्णय घेतला हे देखील त्यावर दिसणार आहे.
■ त्याच दिवशी अन्य प्रकरणांमध्ये काय कार्यवाही झाली आणि आपल्या प्रकरणाबाबत काय कार्यवाही झाली हे कळल्यानंतर जर असे प्रकरण रखडले असेल तर अर्जदार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला यासंदर्भात विचारणा करू शकणार आहे.
■ त्यामुळे एखादे प्रकरण डावलून दुसरे प्रकरण पुढे रेटण्याचा प्रकार या विचारणेमुळे कमी होणार आहे.