आशपाक पठाण
रेशन कार्डला आधार लिंक नसेल तर स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही, अशा सक्त सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यात आधार सीडिंगचे प्रमाण ९८.७९ टक्के झाले आहे.
मात्र, उर्वरित २२ हजार ५० लाभार्थ्यांना वारंवार सूचना करून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लाभार्थ्यांचे मार्च-एप्रिलपासून धान्य बंद केले जाणार आहे.
राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. लातूर जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब व अंत्योदयच्या एकूणच ३ लाख ९८ हजार ५७५ लाभार्थ्यांना दरमहा मोफत धान्य दिले जाते.
धान्य वितरणात सुलभता येण्यासाठी रेशन कार्डवरील सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड ऑनलाइन करून घेण्याचे काम पुरवठा विभागाकडून केले जात आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ९८.७९ टक्के लाभार्थ्यांचे आधार सीडिंग झाले आहे.
लातूर जिल्ह्यात आधार सीडिंगमध्ये निलंगा तालुका आघाडीवर आहे. तालुक्यातील दोन लाख ४१ हजार ३१२ लाभार्थ्यांनी आधार सीडिंग करून घेतले आहे. एकमेव तालुक्यात शंभर टक्के काम झाले आहे. जळकोट, देवणी तालुका पिछाडीवर आहे.
तालुकानिहाय काम, उर्वरित लाभार्थी...
तालुका | शिल्लक | टक्केवारी |
अहमदपूर | २२३२ | ९९.३२ |
औसा | २६८ | ९९.८८ |
चाकूर | १४६४ | ९८.९० |
देवणी | ३२०१ | ९६.०६ |
जळकोट | २५६४ | ९६.०६ |
लातूर | ६५९१ | ९८.६३ |
निलंगा | ०० | १०० |
रेणापूर | ४४५७ | ९५.९१ |
शि. अनंतपाळ | १८०९ | ९७.३७ |
उदगीर | ४६४ | ९९.८० |
एकूण | २२५० | ९८.७९ |
१८ लाख लाभार्थी... स्वस्त धान्याचे
• जिल्ह्यात स्वस्त धान्याचा लाभघेणारे तीन लाख ९८ हजार ५७५ रेशन कार्डवरील १८ लाख २२ हजार १२२ लाभार्थी आहेत.
• दरमहा प्रतिलाभार्थी दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मोफत दिले जातात. यातील १७ लाख ९९ हजार ९५८ जणांनी आधार सीडिंग केले.
• जिल्ह्यात १ हजार ३५१ स्वस्त धान्याची दुकाने आहेत. या ठिकाणी आधार सीडिंगची सोय आहे.
२८ फेब्रुवारीनंतर कारवाई...
शासन आदेशानुसार स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्वांचे आधार सीडिंग, ई-केवायसी करण्याचे काम सुरू आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांनी ते करून घ्यावे. त्यानंतर त्यांचा पुरवठा थांबविला जाणार आहे. वारंवार सूचना देऊनही २२ हजार ५० लाभार्थ्यांचे आधार सीडिंग रखडले आहे. त्याचबरोबर शासन आदेशाप्रमाणे ई-केवायसी करून घेणे महत्वाचे आहे. यासंदर्भातही वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. - व्यंकटेश रावलोड, जिल्हा पुरवठा अधिकारी.
हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी