Join us

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 11:47 AM

Chhatrapati Sambhajinagar weather: १५ ते १९ जूनपर्यंतचा हवामान अंदाज, जिल्हा कृषी विज्ञान केंद्राने दिला शेतकऱ्यांसाठी पिकसल्ला

राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागत असून छत्रपती संभागजीनगर जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यतवा वर्तवण्यात आली असून खरीप पेरण्यांच्या तोंडावर १५ ते १९ तारखेपर्यंत शेतकऱ्यांसाठी जिल्हा कृषी विज्ञान केंद्राने पिकसल्ला दिला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

कमाल तापमान ३५.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५७ ते ९९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते १९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान  सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी हवामान सल्ला

ऊस- वाढीची अवस्था

ऊस पिकामध्ये मोठी बांधणी करून घ्यावी. तसेच पिक १०० ते १२० दिवसाचे झाले असल्यास पिकास जमिनीतून खत देणे टाळावे, याव्यतिरिक्त विद्राव्य खत ठिबक द्वारे द्यावे.

कापूस

कापूस पिकाच्या लागवडीसाठी ३.० ते ४.० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व लागवडीतील अंतर ९० X ६० किंवा ६० X ६० किंवा ६० X ३० किंवा ४५ X ३० सेमी ठेवावे. लागवडीपूर्वी थायरम किंवा कॅप्टन ३.० ग्रॅम व नंतर १० मिली प्रति किलो बियाण्यास अ‍ॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. 

बीजपक्रियेनंतर बीयाणे सावलीमध्‍ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना लागवड करावी. कोरडवाहू कपाशीस लागवडीच्या अगोदर किंवा लागवडीच्या वेळेस खतांची पहिली मात्रा ६०:६०:६० किलो प्रति हेक्टर नत्र, स्फुरद व पालाश रेघाटयावर पेरून द्यावे.

मका

मका पिकाच्या लागवडीसाठी १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व लागवडीतील अंतर ६०X ३० ठेवावे. पेरणी/लागवडपूर्वी ट्रायकोडर्मा ०५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.तसेच सायन्ट्रीनिलीप्रोल + थायोमिथॉक्झाम १९.८० टक्के ४.० मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावे. जेणेकरुन लष्करी अळीचे व्यवस्थापन होईल व नंतर १० मिली प्रति किलो बियाण्यास अ‍ॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी.

बीजपक्रियेनंतर बियाणे सावलीमध्‍ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना लागवड/पेरणी करावी. पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ७५ किलो नत्र ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश दयावे. मका पिकाची लागवड झाल्याबरोबर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ऊगवणीपूर्व तणनाशक (अट्राझिन ५० डब्ल्यू पी) १.५ किलो प्रति हेक्टर ७५० ते १००० लिटर पाण्यात मिसळून हातपंपाने फवारणी केल्यास तणव्यवस्थापन होते.

तूर

तूर पिकाच्या पेरणीसाठी १२ ते १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी १.५ - २.० ग्रॅम बावीस्टीन अथवा २.५ ग्रॅम थायरम व नंतर १० मिली प्रति किलो बियाण्यास राझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. बीजपक्रियेनंतर बियाणे सावलीमध्‍ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना लागवड/पेरणी करावी. पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र ५० किलो स्फुरद दयावे.

मूग/उडीद

मूग/उडीद पिकाच्या पेरणीसाठी १२ ते १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व पेरणीतील अंतर ३० X १० सेमी ठेवावे. पेरणीपूर्वी १.० ग्रॅम कार्बेडेंझीम अथवा २.० ग्रॅम थायरम व नंतर १० मिली प्रति किलो बियाण्यास राझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी. बीजपक्रियेनंतर बियाणे सावलीमध्‍ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना पेरणी करावी. मूग/उडीद पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र ५० किलो स्फुरद दयावे.

टॅग्स :हवामानऔरंगाबादशेतीपाऊसकृषी विज्ञान केंद्र