Join us

Chia Lagwad : पारंपारिक पिकांना नवीन पर्याय चिया पिकाचा; चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 2:46 PM

शेतकरी सध्या औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी चियाची लागवड केली आहे. (Chia Lagwad)

Chia Lagwad : 

वाशिम :शेतकरी आता गहू, ज्वारी, मका यांसारख्या पारंपरिक पिकासोबत पर्यायी पिकांची लागवड करीत आहे. गहू आणि हरभऱ्याच्या पिकाला पर्याय म्हणून आता काही शेतकऱ्यांनी वेगळा पर्याय निवडला आहे.

या पिकाला बाजारात चांगला भावदेखील मिळतोय. त्यामुळे पारंपरिक पिकांसोबतच आता शेतकरी चिया पिकांची लागवड करीत आहे. यावर्षी जिल्ह्यातील जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर चिया पिकांचे क्षेत्र प्रस्तावित आहे.

जिल्ह्यातील शेतकरी सध्या औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी चियाची लागवड केली आहे.

या पिकासाठी कोणतेही रासायनिक खत द्यावे लागत नाही, कोणत्याही फवारणीची गरज नाही, वन्यप्राणीही त्याला खात नाहीत, त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत या पिकाचा उत्पादन खर्च कमी असून, उत्पन्नाची हमी मिळत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

चियाबीज खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते, तर फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनशक्ती वाढते. यांसारखे अनेक औषधी गुणधर्म या पिकामध्ये आहेत.

चिया मूलतः मेक्सिको देशातील पीक असून, भारतात उत्तरेकडील राज्यात याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पारंपारिक पिकाऐवजी चिया पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी चिया पिकांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

ना राखण, ना जनावरांचे 'टेन्शन'

• मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात चिया पिकांची लागवड होत आहे.

• या पिकांची लागवड केल्यानंतर ना राखण करायची गरज आहे. ना जनावरांची काळजी.

• तसेच बाजारात दरही उत्तम मिळतात. त्यामुळे चिया शेती करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :शेती क्षेत्रपीकपीक व्यवस्थापनशेतकरीशेती