Join us

दुष्काळग्रस्त तालुक्यातील मुलांना दिवाळीतही मिळणार दुपारची खिचडी

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 05, 2023 6:00 PM

किती दिवस लागू राहणार सवलत?

दुष्काळग्रस्त तालुक्यातील मुलांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही आता दुपारची खिचडी मिळणार आहे. नुकताच राज्य सरकारने राज्यातील १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दिवाळीच्या सुट्टीतही राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

राज्यातील ४० तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तूट, घटलेली भूजल पातळी, जमिनीतील आर्दता, खरीप पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या निकषांच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आला. यामध्ये १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांमध्ये गंभीर तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. 

दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये मध्यान्ह भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेतंर्गत मुलांना पौष्टीक अन्न देण्यात येण्याच्या सूचना करण्यात येणार आहे. दुष्काळानंतर देण्यात येणाऱ्या या सर्व सूचना पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहेत.

संबंधित जिल्हाधिकारी यांनी या आदेशास जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी द्यावी. तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :दुष्काळशाळापाऊसदिवाळी 2023