फैजुल्ला पठाण
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडासह परिसरात उन्हाळी मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या औषधींची फवारणी केली आहे. तरीदेखील त्यात सुधारणा न झाल्याने धावडा येथील शेतकरी रमेश बोराडे यांनी दीड एकरातील मिरची उपटून फेकली आहे.
भोकरदन तालुक्यात मागील वर्षात उन्हाळी मिरचीचे चांगले उत्पन्न व भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा आपला मोर्चा मिरचीकडे वळवला आहे. या उन्हाळी मिरचीला अगोदरच उष्णतेचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. त्यामुळे काही प्रमाणात मिरचीची रोपे जळून गेली होती. आता कोकडा पडला. उन्हाळ्यात अनेकांनी टँकरने विकतचे पाणी घेऊन दिले आहे.
आता बदलत्या वातावरणामुळे कोकडा, फुलगळ, थ्रिप्ससारख्या रोगाने मिरचीची पिके उद्ध्वस्त होत आहेत. त्यावर महागामोलाची औषधी फवारूनही सुधारणा होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकरी जयंत देशपांडे यांचे दीड एकर शेत रमेश बोराडे यांनी बटाईने केले असून, त्यात मिरचीची लागवड केली आहे.
खरीप पेरणीसाठी उपटली मिरची
मिरचीसाठी रोप, खत, ठिबक, मल्चिंग आणि मजूर असा दीड ते दोन लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मिरची पीक चांगलेच बहरले होते; परंतु त्यावर वातावरणाच्या बदलामुळे कोकडा रोग पडला होता.
त्यामुळे महागडी औषधीची फवारणी करूनही रोग जात नसल्याने आणि भविष्यात मिरची लागणार नसल्यामुळे शेतकरी रमेश बोराडे यांनी ९ जून रोजी मजुराच्या माध्यमातून खरीप पीक घेण्यासाठी दीड एकर मिरची उपटून टाकली आहे.