Join us

मिरची उत्पादक शेतकरी लागले कामाला : मल्चिंग, ठिबक, पाण्याचे नियोजन; उन्हाची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 9:30 AM

यंदा उन्हाची तीव्रता वाढल्याने व पाण्याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी उशिराने मिरची लागवड सुरू

अमोल चितळे

उन्हाळी मिरचीचे उत्पादन घेण्यात अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात सध्या मिरची लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करून पाण्याचे नियोजनही करण्यात येत आहे.

सिल्लोड तालुक्यातील शिवना, आमसरी, वाघेरा, पानवदोड, गोळेगाव, डिग्रस, धोत्रा, नाटवी, वडाळी, टाका, मादणी, जळकीबाजार, खुपटा, दहिगाव, आडगाव येथे गेल्या वर्षी मुबलक पाण्यामुळे एक मार्चपासून मिरची लागवडीस सुरुवात झाली होती. सुरुवातीला शेतकऱ्यांना प्रति किलो चाळीस रुपयांपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत भाव मिळाला.

यंदा मात्र उन्हाची तीव्रता वाढल्याने व पाण्याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी उशिराने मिरची लागवड सुरू केली आहे. मार्चमध्ये बळीराम, ज्वेलरी, शिमला, पिकाडोर तर एप्रिलमध्ये शार्क वन, शिवन, तेजा-फोर, अग्नीशीखा, दिल्ली हार्ट, ज्वाला, लालपरी, शक्ती ५१, अग्नीवीर, ईगल जातींच्या वाणांना शेतकऱ्यांनी लागवडीसाठी पसंती दिली आहे, असे येथील रोपवाटिकेचे मालक रवींद्र काळे यांनी सांगितले.

हिरवी मिरची लगडल्यानंतर तोडणीसाठी परिसरातील हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होतो. मजुरांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली जाते व तोडणीसाठी किलोप्रमाणेदर ठरविले जातात. प्रचंड मेहनतीचे हे पीक असल्याने यंदाही चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

देशविदेशांतून मिरचीला मागणी

शिवना, गोळेगाव व आमठाणा या तीन मोठ्या बाजारपेठा मिरची खरेदीसाठी खुल्या आहेत. येथील मिरचीला मुंबई, वाशी, नागपूर, सोलापूर, पुणे, नंदुरबार आदी शहरे तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरयाणा, पंजाब या राज्यांसह दुबई व आखाती देशात मोठी मागणी आहे. त्यामुळे परराज्यातील व्यावसायिक खरेदीसाठी दाखल होत असतात. - राजू काळे, मिरची व्यावसायिक, शिवना

शिवना मंडळात विक्रमी क्षेत्र

शिवना कृषी मंडळात हिरव्या मिरचीचे दरवर्षी ३७० ते ३८२ हेक्टर एवढे विक्रमी लागवड क्षेत्र असते. त्यापैकी नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या दीडशे हेक्टर क्षेत्रावरील लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. भाव मिळत असल्याने गेल्या सहा वर्षात लागवडीचा आकडा वाढत आहे. - ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :मिरचीशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनसमर स्पेशल