Join us

चोखंदळ आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा,सध्या कोणता आंबा आला बाजारात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 11:47 AM

फळांचा राजा बाजारात येऊ लागला,अनेक कुटुंबांत परंपरा आहे की, अक्षय्य तृतीयेला आमरस खाण्यास सुरुवात करतात व वटपौर्णिमेनंतर आंबे खाणे बंद करतात.

विविध आंब्यांचा दरवळ बाजारात पसरू लागला आहे. काहींनी महिनाभर आधीपासूनच आंबे खाण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही अनेक ग्राहक असे आहेत की, ते अक्षय्य तृतीयेपासून आमरस खाण्यास सुरुवात करतात. मात्र, यास आणखी महिनाभराचा अवधी बाकी आहे. तोपर्यंत खवय्यांना उत्तम आंब्यांची प्रतीक्षा आहे.

४४ दिवस मनसोक्त आंब्यावर मारा ताव

१० मे रोजी अक्षय्य तृतीया व २१ जूनला वटपौर्णिमा आहे. ४४ दिवस हे खवय्ये आंब्यावर मनसोक्त ताव मारू शकतात. मात्र, या खवय्यांना आणखी महिनाभर आपल्या जिभेवर ताबा ठेवावा लागणार आहे.

साधारणतः फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात आंब्यांचे आगमन होते. ज्या किमतीत आंब्याची पहिली पेटी मिळेल, त्या भावात खरेदी करणाऱ्या खवय्यांची संख्या शहरात कमी नाही. चार ते पाच चवीचे आंबे बाजारात आले आहेत. मात्र, अजूनही मोठा वर्ग असा आहे, जो अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवासमोर आंब्याचा नैवेद्य दाखवून नंतरच आमरस खाण्यास सुरुवात करतो.

कोणते आंबे बाजारात ?

 रमजान महिना सुरू असून, रोजे (उपवास) सोडण्यासाठी आमरस खाल्ला जातो. यामुळे आंब्यांना मोठी मागणी आहे. बाजारात बदाम, केशर, लालबाग, मलाईका व हापूस असे पाच जातीचे आंबे सध्या विकले जात आहेत. केशर आंबा कर्नाटक राज्यातून येत आहे. आपल्याकडील अस्सल केशर आंबा मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजारात दाखल होईल.

हापूस आंब्याचा भाव उतरला

सध्या बाजारात रत्नागिरी, देवगड तसेच कर्नाटक, हैदराबाद येथून हापूस आंबा विक्रीला येत आहे. अस्सल खवय्येच रत्नागिरी व देवगडचे आंबे ओळखू शकतात. १० दिवसांपूर्वी ९०० ते १,२०० रुपये प्रतिडझनने विक्री होणाऱ्या हापूसची आवक वाढताच भाव कमी होऊन सध्या ६५० ते १ हजार रुपये प्रतिडझन विकत आहेत.

टॅग्स :आंबाबाजार