अल-निनोच्या प्रभावामुळे मराठवाडा विभागात यंदा कमी पर्जन्यमान झाले, येणाऱ्या रब्बी हंगामात ही पाऊसाची शक्यता कमी आहे. सद्यस्थितीत जमीनीतील ओलावाचा विचार करता कमी पाण्यात येणारे रबी पिके जसे ज्वारी व करडई यासारख्या पिकांची लागवड करणे आवश्यक असुन कमी कालावधीत येणारी वाण निवडावीत असा सल्ला कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने कृषि विद्यापीठ, जिल्हा प्रशासन आणि कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) येथील अधिकारी व कृषी विस्तारक यांच्याकरिता दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी अल-निनोच्या पार्श्वभुमीवर रब्बी हंगामाचे नियोजन यावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, परभणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवी हरणे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, मर्यादित उपलब्ध जमिनीतील ओलावा, मर्यादित पाणी, व कृषि निविष्ठात पिकांची लागवड करण्याकरिता कृषि तंत्रज्ञान व विज्ञानाची जोड पाहिजे. राज्यात अनेक शेतकरी नावीन्यपुर्ण शेती करतात, त्यांचे अनुभवाचा उपयोग कृषि संशोधनात होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी सहभाग कृती संशोधन करण्याची गरज आहे. कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यातील कृषि विभागातील कृषि विस्तारक महत्वाचा दुवा आहेत. अन्न सुरक्षा पुर्णपणे शेतकरी बांधवाच्या हाती असुन राज्य शासन, कृषी विद्यापीठ, कृषि विभाग, आणि शेतकरी यांच्यात सातत्याने संवाद पाहिजे. यावर्षी विद्यापीठाने राबविलेला शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमास शेतकरी बांधव आणि कृषि अधिकारी यांनी मोठा प्रतिसाद दिला. शेतकरी बांधवांना सहज समजू शकेल असे वैज्ञााानिक ज्ञान व माहिती पोचविण्यावर भर द्यावा लागेल. प्रास्ताविकात डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, मराठवाडा साधारणत: १५ टक्के पर्जन्यमान कमी झाले असुन जनावरांकरिता चारापिकांचे नियोजन करावे लागेल.
कार्यशाळेत या वर्षी अल-निनोच्या प्रभावामुळे मराठवाडा विभागात झालेल्या अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभुमीवर पुढील हंगामात पिकांचे नियोजन, उपाययोजना आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत अल-निनो वर्षाच्या पार्श्वभुमीवर रबी हंगामाचे नियोजन, मुख्य रबी पिकांचे लागवड, किड व रोग व्यवस्थापन, कार्यक्षम पाणी व्यवस्थापन, दुष्काळ परिस्थितीत फळबागा वाचविण्यासाठीच्या उपाययोजना, कमी पाण्यावर येणाऱ्या भाजीपाल्याची लागवड, पशुधनाकरिता चारापिकांचे नियोजन, पशुधनाचे लंपीरोग व उष्णतेपासुन संरक्षण आदी विषयावर विद्यापीठ शास्त्रज्ञ सादरीकरण करून मार्गदर्शन केले. रबी हंगामात पीक हवामान दिनदर्शिकेचे विमोजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. डि डि पटाईत यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. कार्यशाळेत मराठवाडा विभागातील कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) येथील अधिकारी व कृषी विस्तारक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, प्रगतशील शेतकरी आदींनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत विद्यापीठ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
मार्गदर्शनात कृषि हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे म्हणाले की, सोयाबीन काढणीनंतर दोन ते तीन दिवसात पेरणी करणे गरजेचे असुन उपलब्ध जमीनीतील ओलावा कमी होण्याची शक्यता आहे. कृषि विद्या तज्ञ डॉ. डब्ल्यु एन नारखेडे म्हणाले की, रब्बी ज्वारीचे परभणी सुपर मोती आणि परभणी शक्ती या वाणांचा पेरणीकरिता वापर करावा, या वाणाची धान्य व कडब्याची प्रत चांगली आहे. किटकशास्त्रज्ञ डॉ. पी एस नेहरकर यांनी केवळ रासायनिक किटकनाशकांचा वापर न करता एकात्मिक किड व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला तर डॉ. एस एल बडगुजर यांनी हरभरा पिकात मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा, बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचा सल्ला दिला. उद्यानविद्या तज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीत फळबागा वाचविण्याकरिता मल्चिंग किंवा आच्छादनाचा वापर करण्याचा सल्ला दिला. डॉ. आर जी भाग्यवंत यांनी रब्बी पिकांतील कार्यक्षम पाणी व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले, कमी पाण्यावर येणाऱ्या भाजीपाल्याची लागवडीबाबत डॉ. व्ही एस खंदारे यांनी मार्गदर्शन केले तर चारा व्यवस्थापनावर डॉ. जी के लोंढे यांनी मार्गदर्शन केले.