बंदी असलेल्या चोर बीटी कपाशी ( Chor BT Cotton:) लागवडीला यंदा चाप बसला. मात्र, सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्राऐवजी तेलंगणातील कृषी केंद्रांतून सर्वाधिक कापूस बियाणे खरेदी केली. तेथील विक्रेते दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर बिल फाडत असल्याने बियाणे उगवले नाही तर भरपाईपासून मुकावे लागणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी तेलंगणातील कृषी केंद्रांवर सध्या गर्दी करत आहेत. तेलंगणाच्या तुलनेत महाराष्ट्रातील बियाणे स्वस्त दरात आहे. तरीही शेतकरी अधिक दर देऊन तेलंगणातील कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करीत आहेत. गोंडपिपरी तालुक्यात कुठलाही उद्योग नाही. केवळ शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. मात्र कधी नैसर्गिक, तर कधी सुलतानी संकटाचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागतो.
बहुतांश शेती नदीकाठावर असल्याने दरवर्षी पुराचा धोका असतो. या भागातील शेतकरी बंदी असलेले चोर बीटी बियाणे लागवड करीत होते. मात्र, हे बियाणे आता विश्वासाचे राहिले नाही. त्यामुळे शेतकरी वैध बियाण्यांकडे वळले. मात्र, लगतच्या तेलंगणा राज्यातील बियाण्यांवर सीमावर्तीत भागातील शेतकऱ्यांच्या भारी विश्वास दिसतोय.
महाराष्ट्रातील कृषी केंद्रांतील बियाणे खरेदी न करता तेलंगणातील कृषी केंद्रांतील बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले आहे. कापूस, सोयाबीन, धानाचे बियाणे खरेदी करीत असले तरी कृषी केंद्रधारक बिल देताना तेलंगणातील एखाद्या शेतकऱ्याचा नावावर बिल फाडत आहेत. त्यामुळे बियाणे उगवले नाही तरी महाराष्ट्रातील शेतकरी तक्रार करू शकत नाही.
बियाण्यांसाठी शिरपूर व आशिफाबाद प्रवास
चंद्रपूर जिल्ह्यातील तोहोगाव-लाठी परिसरात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. बियाणे खरेदीसाठी येथील शेतकरी तेलंगणातील शिरपूर, आशिफाबाद व कागजनगर येथील कृषी केंद्रांमध्ये जात आहेत. तोहोगाव व लाठी परिसरातील शेतकरी कापूस बियाण्यांसाठी तेलंगणात शेकडो किमीचा प्रवास करीत आहेत.
चोर बीटी बियाणे काय आहे?
चोर बीटी (बीजी-३) या कापसाच्या वाणाला अद्याप शासनाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने या बियाणांवर बंदी आहे. मात्र तेलंगणातून चोरट्या मार्गाने सदर बियाणे विदर्भ आणि मराठवाड्यात आणली जातात. मागील काही वर्षांपासून शेतकरी कापूस पिकाकडे वळले आहेत. चंद्रपूरमधील सीमावर्ती चामोर्शी, सिरोंचा, मुलचेरा या तालुक्यांमध्ये दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. कापसाच्या पिकात मोठ्या प्रमाणात गवत उगवत असल्याने गवत काढण्यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी तण नाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी करतात.
तण नाशकाची फवारणी केल्यास त्याचा काही प्रमाणात परिणाम संबंधित पिकावरही होतो. मात्र चोर बीटी या कापसाची लागवड केल्यास तण नाशकाचा काहीच परिणाम पिकावर होत नाही. त्यामुळे चोर बीची लागवड करून मोठ्या प्रमाणात शेतकरी तण नाशकांचा वापर करतात. तण नाशकाच्या अतिवापरामुळे शेतजमीन पूर्णपणे नापीक होते. तसेच पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो, असे तज्ज्ञ सांगतात.
अतिशय घातक असलेली तण नाशके वापरली जात असल्याने मानवाला कॅन्सर होतो किंवा त्याचा मृत्यू सुध्दा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चोर बीटी या बियाणांवर बंदी घातली आहे. तेलंगणातही या बियाण्यांवर बंदी आहे. मात्र तेलंगणा राज्यातून प्रतिबंधीत बियाणे गडचिरोली, चंद्रपूरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आणले जात आहेत.