Lokmat Agro >शेतशिवार > हवामान बदल आणि बदलती पिक पद्धती

हवामान बदल आणि बदलती पिक पद्धती

Climate change and changing cropping pattern | हवामान बदल आणि बदलती पिक पद्धती

हवामान बदल आणि बदलती पिक पद्धती

मागील काही वर्षात पाहिलं तर नेमका पिक काढणीस तयार असताना येणारा पाऊस आणि होणारे नुकसान सातत्याने दिसत आहे.

मागील काही वर्षात पाहिलं तर नेमका पिक काढणीस तयार असताना येणारा पाऊस आणि होणारे नुकसान सातत्याने दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हवामान बदल आणि मान्सूनमधील झालेला बदल (उशिरा येणारा मान्सून) याच्या भोवती आपली शेती तीच नशीब आजमावते आहे. मागील काही वर्षात पाहिलं तर नेमका पिक काढणीस तयार असताना येणारा पाऊस आणि होणारे नुकसान सातत्याने दिसत आहे. हे हवामान बदलाचे चक्र सर्व सृष्टीवर आघात करत राहणार आहेच आपल्याला व आपल्या शेतीला या हवामान बदलाच्या चक्राबरोबर फिरत राहण्यासाठी आपल्या पिकचक्रात काय बदल करता येतो का ते पाहिलं पाहिजे.

महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. हे संकट काल-आज निर्माण झालेले नाही. वर्षानुवर्षं चुकीची धोरणं, अंमलबजावणीतील ढिसाळपणा, सिंचन घोटाळा, हवामानातील बदल, बुडवलेला सहकार, सदोष कर्जवाटप, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन आणि दुष्काळी भागात भूजलाचा बेसुमार उपसा करणारी बोअरवेल संस्कृती, असे अनेक घटक त्यासाठी जबाबदार आहेत. या दुष्टचक्रातून बाहेर पडणे सोपे नसले तरी सरकारने त्यासाठी योग्य दिशा निवडणे आवश्यक आहे.

खुलेले कालवे आणि पाटांनी पाणी पुरवणाऱ्या मोठ्या खुले सिंचन प्रकल्पापेक्षा गावागावांत विकेंद्रीकृत पद्धतीने आणि स्थानिक सहभागातून शेततळी, विहिर पुनर्भरण, नाला खोलीकरण, तलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण अशा अनेक उपक्रमांतून कास्तकाराच्या शेताजवळ पाण्याची उपलब्धी करणाऱ्या जलयुक्त शिवार प्रकल्प बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतात आणि खिशात हिरवाई करून गेला. नाम तसेच पाणी फाउंडेशनसारख्या संस्थांद्वारे जलसंवर्धनाच्या कार्यक्रमांस लोकसहभागाची जोड देणे, सामान्य जनतेला तसेच कॉर्पोरेट कंपन्यांना जलयुक्तच्या कामांमध्ये आपापल्या परीने हातभार लावण्यास उद्युक्त करणे असे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आणि ते यशस्वीपणे पार पडले.

आजची शेती खूप धकाधकीची झाली आहे. पेरावं कधी काढावं कधी याच्यातील सुसूत्रपणा दिसत नाही. पाणी, माती आणि पशुधन या घटकांना केंद्रित ठेवून केली जाणारी शाश्वत शेती आता आपल्या अधिकच्या उत्पादनासाठी एक पिक पद्धती, अधिकच्या निविष्ठा आणि अधिकचे पाणी यांचा भार सोसते आहे. पिक पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. हमखास उत्पन्न देणारे ऊस पिकाखालील क्षेत्र वाढते आहे. हलक्या मगदूरच्या जमिनीहि ऊस पिकाखाली येत आहेत. हमखास उत्पन्न मिळण्याच्या खात्रीमुळे एक पिक पद्धती वाढताना दिसते आहे. यात अधिकच्या उत्पन्नापोटी यात मातीचं आरोग्य पाहायला हवं. त्या मातीचा आपल्या पूर्वजांनी कसा सांभाळ केळा आणि आपण कसा करतो आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला तो कोणत्या स्वरुपात देणार आहोत याकडे बारकाईने पाहण आवश्यक वाटत.

आजच्या शेतीत असंख्य प्रश्न आहेत म्हणूनच नवखा शेतीकडे पाय वळवत नाही पण माती, पाणी आणि देशी पशुधन वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्नदाता टिकला पाहिजे वाढला पाहिजे मोठा झाला पाहिजे तर आपली पोट भरतील हि भावना मनात खोलवर रुजवली पाहिजे. आजच्या शेतीला प्रामुख्याने भेडसावणाऱ्या प्रश्नात हवामान बदल हा प्रमुख प्रश्न वाटतो आहे. मातीत एक दाणा टाकला तर असंख्य दाणे मिळतील का नाही याची शाश्वतता नाही. मिळणारे धान्य लागेल इतक आपल्याला ठेवून उरलेले बाजारात विकायचं पण आता खायला मिळतय का नाही याची खात्री नाही.

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि विभक्त कुटुंबपद्धतीमुळे शेतजमिनीचे तुकडे पडत असून जमिनीच्या छोट्या तुकड्यावर फायद्याची शेती करणे शेतकऱ्याला अशक्यप्राय होत आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती आणि एकत्रित शेती अशी परंपरा होती. काळानुरुप ती बदलली आता विभक्त कुटुंब पद्धती त्या कुटुंबाबरोबर शेतजमिनीचेहि तुकडे होत आहेत. प्रती शेतकरी शेतजमीन (अन्नधान्य मिळण्यायोग्य) धारणा कमी होताना दिसत आहे. कागदोपत्री ती एक एकराच्या खाली विभागून मिळत नसेल पण शेतकऱ्याला मात्र ती विभागून करावी लागते. यातला पुढला धोका काही कालांतराने आता काही गुंठ्यात असणारी जमीन पुन्हा बांधावर येईल आपआपले बांध त्या अनुषंगाने आपली जमीन शोधावी लागेल आणि कालांतराने भूमिहीन होतो कि काय अस वाटतय.

अत्यल्प जमिनधारणा आणि अधिकच्या उत्पन्नासाठी अधिकच पाणी आणि निविष्ठांचा वापर होतो आहे. पिक फेरपालट, आंतरपीक व मिश्रपीक पद्धतीचा अवलंब दिवसेंदिवस कमी होताना दिसतो आहे. पिक उत्पादनावरील वाढता खर्च आजच्या मिळणाऱ्या बाजारभावाला खाऊन टाकतो आहे. आपले पूर्वज एकमनाने एकदिलाने एकत्रित शेती करत होते त्यात ते एकमेकाच्या शेतात शेतकामासाठी जात असत (वारंगूळा, पैरा, इर्जिक इ.) आज शेतीतील मजूर प्रश्न मजूर मिळत नाही शेतकाम लांबणीवर पडते आणि त्यात त्याला नुकसान सहन करावे लागते. याला समूह शेती पर्याय असू शकतो.

हवामान बदल आधारित शेती आणि तंत्रज्ञान यात संरक्षित शेती, काटेकोर शेती यांचा अबलंब होताना दिसतो आहे पण आज अल्प भूधारकांना हे सर्व आजमावणे कठीण आहे. कधी लांबणीवर पडणारा मान्सून, अतिवृष्टी, गारपीठ पिक भरण्याच्या काळात पावसाचा खंड ह्या घटकांचा परिणाम शेतीवर तसेच शेतकऱ्यांच्या मनावर खोलपणे होताना दिसतो आहे. काही ठिकाणी उशिरा पावसामुळे उशिरा पेरणी पिक काढणीला आल्यावर अतिवृष्टी खरीप गेलाच... आता रब्बीची तयारी शेतातील पाण्याचा निचरा आणि खरीप उशिरा म्हणून रब्बी पण उशिरा यात संरक्षित पाण्याच्या सुविधेचा आभाव हे चक्र दिवसेंदिवस बदलत चालल आहे. आपल्याला या बदलाबरोबर आपल्या शेतीत बदल करावे लागणार आहेत. जसे पाण्याचा ताण सहन करणारे वाण आहेत तसे अति पाणी सहन करणारे वाण विकसित करावे लागतील. संरक्षित शेतीचा अवलंब.

एक पिक पद्धतीचा हट्ट न धरता मिश्रपीक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब यात मातीच्या पोषणाबरोबर अन्नदात्याच्या स्वताच्या पोषणसुरक्षेकडे त्याने लक्ष द्यायला हवे आहे यात कडधान्य (कुळीथ/हुलगा, मटकी, मुग, हरभराउडीद, तूर, घेवडा व इतर डाळवर्गीय पिके) भरडधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोदो, वरी, सावा इ.) तेलबिया (करडई, मोहरी, सुर्यफुल, तीळभुईमुग, सोयाबीन इ.) यांचा आपल्या शेतात तसेच आपल्या आहारात अंतर्भाव करणे खूप जरुरीचे आहे. स्थानिक जैवविविधता टिकविण्यासाठी स्थानिक वाणांना आणि व स्थानिक पशुधानांचा सांभाळ यांना अग्रक्रम देणे गरजेचे आहे.

पाणी आणि माती यांचा विचार करता ह्यांना सुरक्षित ठेवून जैवविविधतेला हानी न करता यांचे संवर्धन करून सुरक्षितपणे पुढील पिढीस देणे हे आपले शेती आणि एकूणच शेतकरी हि संकल्पना वाचविण्यासाठीचे प्रमुख ध्येय असावे. उपलब्ध पाण्याचा ताळेबंद न करता पाण्याचा बेसुमार वापर, भूगर्भातील पाण्याच्या अभ्यास न करता सततचा पाणी उपसा, अधिकच्या हव्यासापोटी मातीवर होणारा रसायनांचा आघात यांचे दूरगामी परिणाम दिसायला सुरवात झाली आहे मला वाटत हवामान बदल हे एक त्यातीलच एक छोट संकट असाव म्हणूनच सावध एका पुढल्या हाका. माती, पाणी, पशुधन आणि निसर्गातील एकूणच निस्वार्थी जीवसृष्टी वाचविण्यासाठी आणि संवर्धित करण्यासाठी प्रयत्न करू.

बिभिषण बागल

Web Title: Climate change and changing cropping pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.