Join us

climate change: पर्यावरण रक्षणासाठी हे दोन तरूण निघालेत भारत भ्रमंतीला, तेही सायकलवरून!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 3:46 PM

गावागावांमध्ये जाऊन पोहचवताहेत पाण्याचे आणि झाडांचे महत्व

पर्यावरण रक्षणासाठी हरित भारत, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश देत पश्चिम बंगालमधील राजीबकुमार रॉय (वय २४, रा. कोलकाता) व आसाममधील आदित संगमा (वय २५) हे दोन तरुण देश भ्रमंतीला निघाले आहेत आणि तेही सायकल वरून!

नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर संवत्सर येथील उड्डाणपुलाच्या पुढे हे दोन तरुण भेटले. सायकलवर तिरंगा बांधून निघालेला राजीबकुमार रॉय १९ जुलै २०२३ रोजी कोलकाता येथून निघाला. उत्तराखंड, काश्मीर, लडाख, हरयाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड ही राज्ये पादाक्रांत करत ते महाराष्ट्रात आले आहेत. आसामच्या आदित संगमाची भेट गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाली आणि तोही राजीबकुमार रॉय याच्या भारत भ्रमंती सायकलस्वारीत सामील झाला. गावागावांसह शाळा, महाविद्यालयात ते जातात व तेथे छोटा कार्यक्रम घेऊन ते पाण्याचे, झाडाचे महत्त्व सांगतात. आतापर्यंत त्यांनी १२ हजार ६०० कि.मी.चा प्रवास केला असून या प्रवासात लोकांकडून प्रेम मिळाले, असे ते आवर्जून सांगतात.

तर आमचा उद्देश सफल

तुमच्या या भारत भ्रमंतीने खरेच झाडे लागतील का? लोक पाणी वाचवतील का, असा प्रश्न त्यांना केला असता आम्ही भेट दिलेल्या शाळा महाविद्यालयातील किमान एका विद्यार्थ्याने एक झाड लावले तरी आमचा उद्देश सफल झाल्याचे आम्ही समजू, कोणीतरी हे करावं यापेक्षा आपणच हे करू, असा उद्देश मनात ठेवून निघालो आहोत व दार्जिलिंग येथे आम्ही यात्रेचा समारोप करू, असे ते म्हणाले.

नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात कडुनिंबाची झाडे वाढली आहेत. ती बघून आनंद वाटला. दरम्यान, वेरुळ, अजिंठा लेणी येथील जगप्रसिद्ध लेण्याही अप्रतिम आहेत. तेथील रहिवाशांनी आमचे आनंदाने स्वागत करुन आदरतिथ्य केल्याने भारावून गेलो.-राजीबकुमार रॉय, आदित संगमा

जगभरातील लोक पर्यावरण बदलाच्या संकटाचा सामना करत आहेत. पावसाच्या पाण्यासह शेती, निसर्गाचा होणारा ऱ्हास होत असताना तरुणाईमध्ये निसर्गाविषयी, तापमान वाढ आणि पाण्याच्या वापराविषयी जागृकता पोहोचवण्याचा हा उपक्रम वाखाणला जात आहे.

टॅग्स :ग्रीन प्लॅनेटसायकलिंग