उन्हाळा आला की, वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना प्रत्येकालाच तोंड द्यावे लागते. अनेक रोगांसोबतच या दिवसात नाकातून रक्त येणे ही सर्वांत मोठी समस्या अनेकांना भेडसावते. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
उन्हाळ्यात तापमान वाढले की नाकात कोरडेपणा येतो. नाकात कोरडेपणा आल्याने शिरेमध्ये कोरडेपणा किंवा जखमा फुटतात. त्यामुळे नाकातून रक्तस्राव सुरू होतो. कोरडेपणामुळे रक्तस्राव होण्याची समस्या असू शकते.
ही समस्या ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जास्त आढळते. नाकातील अॅलर्जी, अंतर्गत शिरा किंवा रक्तवाहिन्या खराब होणे, सर्दी यामुळे ही समस्या उद्भवू शकते. शेतकरी बांधव शेतामध्ये काम करता असतात अशावेळी अशी लक्षणे दिसू शकतात. त्यासाठी शेतात काम करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
लक्षणे कोणती?
• दोन्ही नाकपुड्यांतून रक्त येणे
• कानातून आणि तोंडातून रक्त येणे.
• नाक चोंदल्यासारखे वाटणे.
• गळा किवा नाकाच्या मागच्या बाजूला पातळ पदार्थ असल्याची भावना होणे.
• ताप येणे, थंडी वाजणे.
• शुद्ध हरपणे.
• कान, नाक व चेहरा दुखणे.
या त्रासाची शक्यता कुणाला अधिक?
- काही लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. खूप उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना नाक कोरडे झाल्यानंतर त्याला धक्का न लागताही नाकातली धमनी फुटून रक्तस्त्राव होऊ शकतो.
- रक्ताची गुठळी बनण्याला अवरोध करणाऱ्या आणि रक्त पातळ करणाऱ्या अशा गोळ्या सुरू असतील आणि अशाच वेळी नेमका नाकाचा घोळणा फुटला तर येणारे रक्त लवकर थांबत नाही.
नाकातून रक्त आल्यास हे करा!
१) थंड पाणी डोक्यावर टाकल्यास नाकातून रक्त येणे बंद होते.
२) बर्फ कपड्यात लपेटून नाकाजवळ ठेवल्यास रक्त येणे बंद होते.
असे होऊ नये म्हणून काय करावे?
थोडा ओलसर केलेला रुमाल बाहेर जाताना नाकावर बांधावा, यामुळे थेट गरम हवा नाकात जाणार नाही.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याच्या घटना घडत असतात. नाकातून येणारे रक्त बराचवेळ न थांबल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे कधीही चांगलेच असते. - डॉ. ए. के. कदम