हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागात मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला असला तरी नाशिक जिल्ह्यात मागील दोन दिवस पिकांना नुकसान पोहोचेल असे वातावरण नव्हते. रविवारी (दि.७) रोजी देखील थंडीचा कडाका राहणार असला तरी पावसाची शक्यता कमीच असल्याचे म्हटले आहे.
सध्या कांद्यासाठी पोषक वातावरण होते असे कांदा-द्राक्ष कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी संशोधन अधिकारी राजेंद्र बिन्हाडे यांनी सांगितले. नाशिकसह मध्य महाराष्ट्रात दि.१ ते ४ जानेवारीदरम्यान कोरडे वातावरण होते, तर दि. ५ व ६ रोजी तुरळक कोरडे वातावरण होते. रविवारी (दि.७) देखील तुरळक कोरडे वातावरण असेल. मात्र, यामुळे पिकांना कोणतीच हानी नाही तर मुख्य पिकांसाठी पोषक वातावरण राहणार असल्याचे हवामान, कृषी अभ्यासकांनी म्हटले आहे. नुकसान पोहोचून माल खराब होईल अशा रोगाचा प्रादुर्भाव द्राक्षांवर नसल्याचे देखील म्हटले आहे. काही भागात द्राक्षबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गावठी कांद्याची लागवड जोमात
■ निफाड, लासलगावसह जिल्ह्यातील इतर भागात वातावरण उत्तम असल्याने गावठी कांद्याची लागवड जोमात सुरू आहे. पुढचे दहा दिवस असेच वातावरण पाहिजे. यंदा थंडीचे प्रमाणही कमी आहे.
द्राक्ष काढणीच्या अवस्थेत
■ पोषक वातावरण असल्याने रंगीत द्राक्ष सध्या काढणीच्या अवस्थेत आले आहेत. द्राक्ष बागेत पाणी उतरण्याचे सुरू आहे.
■ आवश्यक त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी फवारणी करावी, असे आवाहन संशोधन केंद्राचे प्रभारी संशोधन अधिकारी राजेंद्र बिन्हाडे यांनी केले.
पुढील काही दिवस अशी घ्या काळजी
■ वांगी, मिरची, टोमॅटोची तोडणी करण्यास हरकत नाही.
■ उन्हाळी भाज्यांच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी.
■ ज्वारी, गहू, कांदा, हरभरा पिकात अंतर मशागत करावी.
■ उशिरा पेरणी केलेल्या गव्हास हेक्टरी ४० किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा द्राक्ष बागेत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाटल्यास कार्बेन्डाझिम मॅन्कोझेब औषध १.५ प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
■ हरभऱ्यावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.