पुणे : सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. जुलै २०२२ मध्ये आणि त्यानंतरही पुणेकरांनीही पूरस्थिती अनुभवली आहे. अशी परिस्थिती येण्यापूर्वीच आता ३ ते ६ किमी अंतरावर ढगफुटी होणार असेल तर त्याची माहिती तीन-चार दिवसांअगोदर समजणार आहे.
'आयआयटीएम' संस्थेने 'अर्क' नावाचा महासंगणक बनवला आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. पुण्यामध्ये पाषाण येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) या संस्थेने हा महासंगणक तयार केला आहे. ही संस्था हवामान क्षेत्रात संशोधन करते.
या संस्थेने आतापर्यंत १२ किमी उंच किंवा लांब असलेल्या हवामानाचा अंदाज दिला आहे. पण, आता ३ ते ६ किमीपर्यंतचा हवामान अंदाज या महासंगणकामुळे देता येणे शक्य होणार आहे. एखाद्या भागात ढगफुटी होणार असेल तर लोकांना दोन दिवसांपूर्वी तशी सूचना देता येईल. जेणेकरून तेथील नुकसान कमी करता येणार आहे.
फायदा कोणाला होणार ?
ढगफुटी होणार असेल तर त्याची माहिती समजणार असल्याने वेळीच उपाययोजना करता येतील. त्याचा फायदा शेतकरी, नागरिकांना होणार आहे. आतापर्यंत १२ किमीवरील हवामान अंदाज देता येत होता. पण, या महासंगणकामुळे ३ ते ६ कि.मी. अंतरावरचे अंदाज देता येतील. चक्रीवादळ, अतिवृष्टी नेमक्या किती अंतरावर होणार आहे, तसेच गारपीट, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ पडणार अहे का? यांचाही अंदाज किमान ३ ते ६ दिवस अगोदर देता येणार आहे.
महासंगणकावर रडार जे रीडिंग दाखवते, त्यावरून गणित अत्यंत वेगाने होईल. हे महासंगणक रडार आणि सॅटेलाइटच्या रीडिंगचे गणित काही क्षणांत सोडवेल. त्यामुळे दोन-तीन दिवसांचे काम अर्ध्या तासात होणार आहे. त्याची अचूकता प्रचंड आहे. त्यामुळे हवामानाचे अंदाज अचूक देता येतील. - डॉ. पानी मुरली कृष्णा, प्रमुख, आयआयटीएम, पुणे.