बदनापूर : नारळ उत्पादन वाढविण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नारळ विकास बोर्ड, ठाणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर यांनी संयुक्तपणे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेत नारळ उत्पादकांना नारळाच्या नवीन पद्धतींची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत नारळाच्या विविध जाती, लागवड, खत व्यवस्थापन, रोग किटक नियंत्रण, नारळाचे प्रक्रियाकरण आणि त्याचे विपणन या विषयांवर तज्ञांनी व्याख्यान दिली. या कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
यावेळी नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक रवींद्रसिंग कुमार यांनी सांगितले नारळ उत्पादन हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना नारळ उत्पादनातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत.
तर कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी आम्ही शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नारळ उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेता येईल असे यावेळी सांगितले.
प्रगतीशील शेतकरी पांडुरंग डोंगरे म्हणाले यांनी यावेळी या कार्यशाळेमुळे आम्हाला नारळ उत्पादनातील बरेच नवीन ज्ञान मिळाले आहे. मी आता माझ्या नारळ बागेत ही नवीन तंत्रज्ञाने वापरणार असल्याचे अभिमानाने सांगितले.
सदरील एक दिवसीय कार्यशाळेच्या कार्यक्रमात रा.कृ.सं.प्र, छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार हे अध्यक्षपदी होते. त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना रब्बी हंगाम पूर्वी लागवड नियोजन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर प्रभारी अधिकारी मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर डॉ. संजय पाटील यांनी नारळ लागवडी बाबत येणाऱ्या समस्या बाबत सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. आर. एल. कदम यांनी केले तर डॉ. डी. बी. कच्चवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.