Join us

नारळ - मसाला मिश्र पिकांची लागवड फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 12:11 PM

ठिबक सिंचनाव्दारे कार्यक्षम वापर करून नारळ मसाला मिश्र पिकांची लागवड फायदेशीर ठरत आहे. या बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्यांची लागवड ७.५ बाय ७.५ मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे.

उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाव्दारे कार्यक्षम वापर करून नारळ मसाला मिश्र पिकांची लागवड फायदेशीर ठरत आहे. या बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्यांची लागवड ७.५ बाय ७.५ मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे. चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरीवेल अशा ५६.२५ चौरसमीटर क्षेत्रामध्ये सरासरी १७ झाडांची लागवड केली असून, त्याची उत्पादकता ३० रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे अपेक्षित आहे. त्यामुळे एक एकर क्षेत्रातून २.५० लाख रुपये म्हणजेच एक एकर क्षेत्रातून एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

नारळ - मसाला मिश्रपिकाच्या लागवडीसाठी चांगल्या जमिनीची निवड, योग्य पाणी पुरवठा, अनुकूल नैसर्गिक हवामान या बाबी मूलभूत आहेत. विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार नारळ तसेच मिश्र पीक म्हणून मसाला पिकांची लागवड करावी. या लागवडीसाठी जमिनीची खोली एक मीटर असणे आवश्यक आहे. या बागेतील नारळ, जायफळ यांच्या लागवडीसाठी एक बाय एक मीटर आकाराचे तर दालचिनी व काळीमिरी लागवडीसाठी अनुक्रमे ०.६० बाय ०.६० बाय ०.६० मीटर व ०.३० बाय ०.३० बाय ०.३० मीटर आकाराचे खड्डे मारत त्यांच्या तळाशी वाळवी, हुमणी प्रतिबंधक कीटकनाशके वापरावीत. खड्ड्याच्या तळाशी कुजलेला पालापाचोळा किंवा गिरीपुष्पाचा पाला, २ ते ३ घमेली चांगले कुजलेले शेणखत, शिफारशीनुसार सिंगल सुपर फॉस्फेट व चांगली माती जमिनीच्या पृष्ठभागाच्या थोडी वर ठेवावी. जेणेकरून पावसाचे पाणी बुंध्याशी साठणार नाही. खड्डयाच्या चारही कोपऱ्यावर किंवा मध्यभागी खुणेसाठी खुंट ठेवावेत.

नारळ व मसाल्यांची पिके एकाचवेळी लावता येणार नाहीत. पहिल्या वर्षी विद्यापीठाने शिफारस केलेल्या प्रताप, टीडी, डीटी यांसारख्या नारळ जातींच्या जोमदार रोपांची निवड करून जून किंवा जुलैमध्ये लागवड करावी. कोकणात सूर्यप्रकाशाचा दालचिनीच्या झाडावर तितकासा विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे पहिल्या वर्षी नारळ व दालचिनी या दोनच पिकांची लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. पाचव्या वर्षी जायफळ लागवड करावी. जायफळाला पहिली तीन वर्षे सावली करावी.

क्रमाने लागवडऑक्टोबर व पहिल्या उन्हाळ्यात नारळाच्या झाडासही सावली करावी. बागेमध्ये सुरुवातीच्या काळात केळी/पपईची मिश्र पीक म्हणून लागवड केल्यास मसाला पिकांना सावली तर मिळतेच शिवाय केळी पपई उत्पादनातून बागेच्या व्यवस्थापनावर होणारा खर्च काही प्रमाणावर भागवता येतो. मिश्रपीक म्हणून सुरुवातीच्या काळात अननसाची लागवड करणे शक्य आहे. सातव्या वर्षी नारळ झाडाच्या बुंध्याजवळ मिरीच्या वेलांची लागवड करावी. तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला दालचिनी उत्पन्न सुरु होईल. अति उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे जायफळ उत्पादन सुरु होते.

टॅग्स :शेतीफळेशेतकरीकोकणपीकठिबक सिंचन