जिल्हा कृषी विभागाच्या वतीने शेतसरी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मिलेट्स पे चर्चा या उपक्रमाच्या मिलेट रथाचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी हिरवा झेंडा दर्शवत स्वागत केले आहे. शेतकरी घेत असलेल्या भरड धान्यांना व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याचे काम शेतसारी फार्मर प्रोड्युसर कंपनी करत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, भिमराज दराडे, शशिकांत मंगरुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, शेतसारी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे (फॉरमी फूडस) शशिकांत बोडके आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष-२०२३ या अनुषंगाने संपूर्ण भारतभर मिलेटस् व मिलेटसच्या उत्पादनाचा प्रचार व प्रसार होत आहे. त्याच माध्यमातून शेतसरी फार्मर प्रोड्युसर कंपनीने (फॉरमी फूडस) मिलेटसपासून वेगवेगळी प्रक्रिया राबवून पदार्थ बनवले आहे. जनसामान्यांत भरड धान्यांचे महत्व वाढावे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगले उत्पादन मिळावे आणि पौष्टिक तृणधान्यांच्या बाबतीत प्रचार प्रसार व्हावा, यासाठी हा रथ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतसरी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे (फॉरमी फूडस) संचालक शशिकांत बोडके यांनी उपक्रमाची माहीती देताना, महाराष्ट्रात फिरुन ‘मिलेट रथ’ जनजागृती करणार असून ज्वारी असलेली बाकरवडी, नागली, बाजरी, ज्वारीची पुरी असे वेगवेगळे पदार्थ तयार केलेले आहे. तृणधान्याच्या पौष्टीकतेबाबत जनजागृती होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ‘मिलेट रथ’ फिरुन जनजागृती करणार आहे, अशी माहिती बोडके यांनी दिली.