Join us

रंग बरसे! या पाच फुलांच्या रंगांनी करा वसंत ऋतूचं स्वागत

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 24, 2024 5:01 PM

या पाच  फुलांपासून असे बनवता येतील होळीसाठी खास नैसर्गिक रंग

वसंत ऋतूचे रंगांची उधळण करत स्वागत करणारा होळी सण अनेक रंगानी भारलेला. पिवळ्या धमक पानगळीसह शेकडो रंगीबेरंगी फुलांनी भारून टाकणारा.

'केतकी, गुलाब जूही चंपक बन फूले' हे बसंत बहार या चित्रपटातलं भीमसेन जोशींनी गायलेल्या या ओळी वसंत ऋतूचं अचूक वर्णन करणाऱ्या.  निसर्गात होणाऱ्या बदलांचं उत्साहात स्वागत करण्याची भारतीय संस्कृतीची शिकवण. त्यात कधी दिवे असतात तर कधी रंग.

रंगांची उधळण करत वसंत ऋतूचं भारतभर दरवर्षी नेमानं स्वागत होतं.  अनेकदा या स्वागतात काही निसर्गाला अनुकूल नसणारे बदल ओघाने झाले खरे! कधी टँकरभर पाण्यात भिजून तर रासायनिक रंगांचा वापर करत ऋतूचं स्वागत कृत्रीम झालं आहे. प्लास्टिकच्या पिशवीत बंद जणू!  

पण आता रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंग वापरण्याकडे तरूणाईचा कल वाढला आहे. त्यामुळे हळूहळू का असेना कृत्रिम रासायनीक रंगांपेक्षा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या फुलांपासून बनलेल्या रंगांनी होळी खेळण्याकडे तरूणई आकर्षित झालेली दिसते.

या पाच फुलांपासून तुम्ही रंग बनवून घ्या होळीची मजा...

पलाश

होळीचे रंग तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोकप्रीय फुलांपैकी एक पळसाचे फुल. ताज्या नांरंगी फुलांचा वापर केशरी रंग तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी ही फुले एका मोठ्या भांड्यात रात्रभर भिजवा. पाणी सुंदर केशरी रंगात बदलल्यानंतर ते उकळवा. ते घट्ट झाल्यानंतर त्याची मऊ पेस्ट तुम्हाला रंग म्हणून वापरता येईल.

जास्वंद

जास्वंदाच्या फुलांच्या लालबुंद पाकळ्यांपासून सुंदर लाल रंग बनवता येईल. जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या कोरड्या कापडावर पसरवा. त्यांना वाळवून त्याची पावडर तुम्ही रंग म्हणून लाऊ शकता.

गुलाब

गुलाबाच्या कितीतरी रंगांचा वापर तुम्हाला होळीत रंग बनवण्यासाठी होऊ शकतो. पाण्यातला रंग तुम्हाला हवा असेल तर गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून घट्ट होईपर्यंत उकळवून वापरता येऊ शकतो.

झेंडू

होळीचा पिवळा रंग बनवण्यासाठी झेंडूच्या फुलाचा देखील  वापर केला जाऊ शकतो. त्यांना जास्वंदाप्रमाणे वाळवा आणि बारीक पावडरमध्ये बदला. सुसंगतता सुधारण्यासाठी, 1-2 चमचे तांदूळ पीठ घाला. तुम्ही त्यांच्या पाकळ्या पाण्यात टाकूनही उकळू शकता.गुलमोहर/ गोकर्ण

गुलमोहर किंवा गोकर्णाची फुले तुम्हाला निळा रंग बनवण्यासाठी फायद्याची ठरतील. वरीलप्रमाणे पाकळ्या वाळवून त्याची पावडर रंग म्हणून वापरता येऊ शकते.

टॅग्स :होळी 2024रंगफुलं