शेतात काम करण्यासाठी सालगड्यांची मनधरणी करणे सुरू झाले आहे. परंतु शेतमजुरांकडून, मालक निवडणुकीनंतर बोलणे करायला येतो, असे संदेशप्राप्त होत असल्याने शेतकरी डोक्याला हात मारून घेताना दिसत आहेत.
गुढीपाडव्याला मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी शेतात वर्षभर काम करण्यासाठी सालदार ठेवावे लागतात. मात्र सध्या सालगडी सहजासहजी मिळत नाही. त्यांचे सालही वर्षानुवर्षे वाढत आहेत. आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही. मात्र, वडिलोपार्जित शेती व्यवसाय सुरू असल्याने तो करताना सालगड्याशिवाय पर्याय नाही.
काही वर्षांपूर्वी स्वतः हून सालदार घरी यायचे व कामावर ठेवा म्हणून विनवणी करायचे. जे नियमित कामावर राहायचे तेच पुन्हा वर्षानुवर्षे सालदार म्हणून नोकरी करायचे. मात्र, आता काळ बदलत गेला व सालदारही कमी झाले. सालदारीची प्रथा मोडीत निघताना दिसत आहे. शेतातील मांडवाला व मालकाच्या घरादाराला जुना सालदार आंब्याच्या पानांचे तोरण बांधून नवे साल ठरवायचा किंवा दुसऱ्याकडे नोकरी वेळ मालकावरच आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी सालगडी बंद करून शेती मक्त्याने किंवा बटईने लावून देण्यावर भर दिला आहे. वर्षभर एका शेतकऱ्याकडे अटकून राहण्यापेक्षा रोजंदारीला पसंती दिली जात आहे.
तेलंगणातील शेतकऱ्यांना मक्त्याने जमिनी
आष्टा परिसरात शेती व्यवसाय खर्च जास्त, उत्पन्न कमी, भावात घट त्यामुळे कोरडवाहू सोबतच पाण्याखालच्या शेतीचा व्यवसायही संकटात सापडला असून निसर्गचक्राच्या माऱ्यामुळे तसेच पीक विमा शासकीय मदतीच्या अभावाने शेतकऱ्यांनी आपली पाण्याखालची सुपीक जमीन आंध्र प्रदेश, तेलंगणातील शेतकऱ्यांना मक्त्याने देणे पसंत केले आहे.
या व्यावसायिक शेतकऱ्यांनी गाळयुक्त सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा, कीटकना- शकांचा मारा करून नगदी पिके घेण्याकडे कल वाढवत जमिनीचे नुकसान केले आहे.
यंदा १० ते १५ टक्के वाढीची मागणी
माहूर तालुक्यातील आष्टा परिसरात सव्वा ते दीड लाख रुपये साल रकमेवर सालदार काम करीत आहेत. कुठे यापेक्षाही जास्त साल आहे. यंदा १० ते १५ टक्के पुन्हा वाढ मागत आहेत. त्यामुळे शेती करणे अवघड ठरत आहे. सणावाराला सालगड्याच्या पूर्ण परिवाराला वर्षातून दोन वेळा कपडे इतका मोठा खर्च करूनही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी मिळत नाही.