मोबीन शेख
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील रमेश सांडू कनगरे (वय ५५) व त्यांची पत्नी विमल कनगरे (वय ५१) दोघेही अल्पशिक्षित आहेत; मात्र या दाम्पत्याने हाती घेतलेला उपक्रम हा उच्चशिक्षितांनाही लाजवेल, असाच आहे.
मागील अकरा वर्षात त्यांनी गावरान आंबा, चिंच, जांभूळ, लिंब, सीताफळ, जांब, बोर, आवळा, बेल, कडूनिंब अशा विविध झाडांच्या बियांपासून स्वखर्चाने ४५ हजार रोपे तयार करून त्यांचे मोफत वाटप केले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई रमेश व त्यांच्या पत्नीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दानापूर ग्रामपंचायतीत रमेश कनगरे हे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासून झाडे लावण्याची आवड आहे. स्वतःची जागा नसल्याने सुरुवातीच्या काळात त्यांना बियांपासून रोपे तयार करण्यासाठी मोठी अडचण येत होती. म्हणून त्यांनी पहिल्या वर्षी ग्रामपंचायतीच्या जलकुंभाखाली रोपे तयार केली. त्यानंतर घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत रोपे तयार केली.
नर्सरीसाठी वेगळे कोटेशन भरून नळ घेतला. दरवर्षी धरणातून निघालेला गाळ आणणे व मे महिन्यात ४ हजार प्लास्टिकच्या पिशव्यांत माती भरून ठेवणे व जून-जुलै दरम्यान समाधानकारक पाऊस झाल्यास माळरानावरून वेचून आणलेल्या बियांचे रोपण करून त्याचे संगोपन केले जाते. त्यानंतर साडेतीन हजार रोपाचे मोफत वाटप केले जाते, असे कनगरे यांनी सांगितले.
यंदा त्यांचा हा उपक्रम १२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आजपर्यंत त्यांनी शासनाकडून कुठलीही मदत घेतली नाही. वनमंत्री, जिल्हाधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडून साधी कौतुकाची थापही मिळाली नाही. सध्या गावरान आंब्याची २०००, चिंच - ५००, जांभूळ ५००, लिंब ४०० बेल - १०० अशी एकूण ३५०० रोपे तयार आहेत.
यंदा मुबलक प्रमाणात पाणी
• यंदा पाऊस चांगला झाला असून, नळाला तिसऱ्या दिवशी पाणी येते. त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता नाही. मागील वर्षी टँकरद्वारे पाणी आणून रोपे तयार केली होती.
• त्यासाठी २५००० रुपये खर्च आला होता; परंतु आता पाण्यासाठी कुठलेही पैसे देण्याची गरज नाही, असे कनगरे यांनी सांगितले.
दहा वर्षांत शेतकऱ्यांना मोफत रोपांचे वाटप केले. प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. दहा वर्षांत ४० ते ४५ हजार रोपे वाटली. त्यापैकी ३५ हजार रोपे जगली आहेत. तुम्ही दिलेली रोपे खूप छान झाली, असे लोक मला भेटून सांगतात, तेव्हा हे ऐकून समाधान मिळते. - रमेश कनगरे, रहिवासी, दानापूर.