Join us

अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:30 IST

ativrushti nuksan bharpai पावसाळ्यातील जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते.

पुणे : जिल्ह्यात पावसाळ्यातील जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते.

या नैसर्गिक आपत्तीत फळबागांसह विविध पिकांचे नुकसान झालेल्या २२ हजार २१० शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून १३ कोटी २३ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

यातील ११ हजार २९० शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे बँक खात्यात ७ कोटी ६० लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मदतीचा निधी पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

यंदा जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागवली होती. त्यानुसार तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी शेतीपिकांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांची यादी तयार करून सरकारला पाठवली.

राज्य सरकारने ही यादी डीबीटी संकेतस्थळावर प्रकाशित करून शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आधार कार्ड - बँक खाते लिंक करणे आवश्यकनुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. आधार लिंक नसल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यात अडचण येऊ शकते. अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निधीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात थेट मदतीचा पैसा गेल्याने त्यांना शेतीसाठी आवश्यक तयारी करणे आणि कर्जफेड करणे सोपे होईल, असे सूत्रांनी कळवले आहे.

अधिक वाचा: गावातील सर्व मयत खातेदारांच्या सातबारावरील वारसांच्या नोंदीसाठी मोठी मोहीम; आला शासन निर्णय

टॅग्स :शेतीशेतकरीपीकपाऊसराज्य सरकारसरकारपुणेबँकआधार कार्डतहसीलदार