बीड जिल्ह्यात एप्रिल व मे २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागाने पंचनामे केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य शासनास नुकसानीसंदर्भात निधी मागणी केली.
त्यानुसार राज्य शासनाने एप्रिल व मे या दोन महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी ८ हजार ४७६ शेतकऱ्यांना ६ कोटी ९९ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. सदरील रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
बीड जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एकावेळी याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तीव्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज, कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे.
२२ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार अवेळी पाऊस, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
दरम्यान, महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर पंचनामे करून त्याचा अहवाल वेळेत पाठविला. त्यामुळे नुकसानभरपाई मागणीचा निधी वेळेवर राज्य शासनाकडे सादर झाला. बाधित शेतकऱ्यांना या निधीचा मोठा आधार होणार आहे.
अधिकाऱ्यांना सूचना
■ शेतकऱ्यांना नुकसानीची मदत वाटप करताना राज्य शासनाने काही सूचना केल्या आहेत.
■ एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत दिली जात आहे का? याची खात्री करावी, कोणत्याही लाभार्थीस दोन वेळा मदत दिली जाणार नाही, याची काळजी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने घ्यावी, जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात असल्याची खातरजमा करावी, ज्यासाठी निधी दिला आहे. त्यासाठी त्याचा वापर करावा यासह इतर सूचना देण्यात आल्या आहेत.
नुकसान कालावधी
एप्रिल २०२४
बाधित क्षेत्र १३७.४४
एवढा निधी झाला मंजूर ४६०००००
मे २०२४
बाधित क्षेत्र २१३७.९९
एवढा निधी झाला मंजूर ६५३०००००
डीबीटी पध्दतीने मदत होईल जमा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यावर नुकसानीची रक्कम डीबीटी पोर्टलव्दारे वितरित होणार आहे. त्यासाठी लाभार्थीची अचूक माहिती विहित नमुन्यात तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरण्याचे काम अधिकारी करणार आहेत. तसेच लाभार्थीच्या मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीची यादी जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाणार आहे.