गेल्यावर्षी पावसाळी हंगामात केळीवर फळ पिकावर कुकुंबर मोझॅक व्हायरसची बाधा झाली होती. जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील उत्पादकांना मोठा फटका बसला होता. राज्य शासनाने या सातही तालुक्यांतील १५ हजार ६६३ उत्पादकांना प्रतिहेक्टर ३६ हजारांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार निधीही वितरित केला असून केळी उत्पादकांना या भरपाईच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे.
जून ते ऑगस्ट २०२२ च्या कालावधीत अतिवृष्टीसह चक्रीवादळामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने दि. १३ ऑक्टोबर २०२२ व २० जून २०२३ रोजी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार अनुक्रमे ७ कोटी ५५ लाख व १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. तसेच २७५ गावांतील केळीला कुकुंबर मोझॅक व्हायरसने (सीएमव्ही) घेरले होते. ८ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रावरच्या केळीला या व्हायरसचा फटका बसला होता.
केंद्र शासनाच्या नियमांनुसार व्हायरसमुळे झालेल्या नुकसानीला नैसर्गिक आपत्ती म्हणून मान्य केले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार सीएमव्हीबाधित पिकापोटी १९ कोटी ७३ लाख ४४ हजारांच्या भरपाईला दि.५ सप्टेंबर रोजी मंजुरी दिली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित निकषांनुसार व दराने या भरपाईला मंजुरी देण्यात आली आहे.
या भरपाईच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. जळगावच्या १५ हजारांवर शेतकऱ्यांना त्याचा लाभ देता आला, याचे समाधान आहे. - अनिल पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री