अटल सौर कृषी पंप योजनेतून अनुदानावर घेतलेला सौर पंप खराब निघाल्याने नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या संबंधित कंत्राटदार कंपनीला दिले.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आनंदगाव येथील शेतकरी तक्रारदार नानाभाऊ धर्मा काळे यांनी गट क्र. २०९ मध्ये ऑफलाइन सोडत पद्धतीने ५ एचपीचा पंप व सोलार पॅनलसाठी शासनाकडे अर्ज केला होता. या पंप व सोलार पॅनलची किंमत २ लाख ४० हजार चारशे नव्वद अशी आहे. शेतकरी काळे यांनी स्वतःच्या हिश्याचे १२ हजार २५ रुपये २१ फेब्रुवारी २०१९ रोजी भरले आणि रवी चंद्रन सगुणा पंप्स अँड मोटर्स, कोईम्बतूर यांच्याकडून खरेदी केला होता. त्याला लातूर येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागीय कार्यालयाने संमती दिली होती.
या संचाची ५ वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी कंपनीची होती. परंतु या पंपात २०२१ मध्ये बिघाड झाला. कंपनीकडे तक्रार करूनही काहीही फरक पडला नाही. पंप दुरुस्त करून देण्याची तजवीज सुद्धा दाखवली नाही. त्यामुळे तक्रारदाराने कंपनीला कायदेशीर नोटीस पाठविली. या नोटीसला कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतकरी काळे यांनी वकिलांमार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार क्र. ८०/२०२३ दाखल केली.
या तक्रारीच्या झालेल्या सुनावणीत तक्रारदाराची बाजू ऐकून घेतल्यानंतर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागीय कार्यालय लातूर व रवी चंद्रन सगुणा पंप्स अँड मोटर्स कोईम्बतूर यांना आयोगाने नोटीस बजावल्या. परंतु दोघेही हजर झाले नाहीत. त्यामुळे आयोगाने एकतर्फा निकाल दिला. शेतकऱ्याच्या वतीने अॅड. एन. के. देशमुख. यांनी बाजू मांडली व त्यांना अॅड. एस. आर. कुंभार, अॅड. व्ही. सी. मिसाळ, अॅड. एन. के. सिरसट यांनी सहकार्य केले.
...असा दिला आयोगाने आदेश
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागीय कार्यालय लातूर व रवी चंद्रन सगुणा पंप्स अॅन्ड मोटर्स कोईम्बतूर यांनी तक्रारदार शेतकऱ्याला दिलेला सोलर पंप संच हा आदेशाच्या तारखेपासून ४५ दिवसात दुरुस्त करून द्यावा अथवा नवीन सोलार पंप द्यावा अथवा, त्या पंपाची किमत रक्कम रुपये २ लाख ४० हजार ४९० रुपये द्यावी.
तसेच मुदतीत रक्कम न दिल्यास दसादशे १२ टक्के व्याज द्यावे. तसेच तक्रारदार यास नुकसान भरपाईपोटी २० हजार रुपये, तसेच खर्चापोटी २० हजार रुपये ४५ दिवसांत देण्यात यावेत. अन्यथा रक्कम जमा करेपर्यंत ८ टक्के व्याज देण्यात यावे, असे आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष हरीश गो. अडके, सदस्या सतिका ग. शिरदे यांनी दिले.