Join us

छत्रपती संभाजीनगरात निंदणी,फवारणीच्या कामांना वेग

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 29, 2023 7:41 PM

जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पेरण्या झाल्या असून आता निंदणी आणि फवारणीच्या कामांना वेग आला आहे. राज्यात एका बाजूला पूरग्रस्त स्थिती निर्माण ...

जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पेरण्या झाल्या असून आता निंदणी आणि फवारणीच्या कामांना वेग आला आहे. राज्यात एका बाजूला पूरग्रस्त स्थिती निर्माण होण्याइतका पाऊस झाला असला तरी मराठवाड्यात पावसाने हुलकावणी दिल्याचेच चित्र दिसत आहे. ना पाऊस ना ऊन अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दुबार फवारणीची वेळ आली आहे. तसेच यंदा झालेल्या पावसाने शेतात तण वाढले आहे. अनेक शेतकरी शेतात तणनाशके फवारत आहेत. 

मक्यावर कीड झाल्याने पिकावर पुन्हा एकदा फवारणी करावी लागत असल्याचे चंद्रभागा काकडे म्हणाल्या.  "जीव कद्रुन गेला आहे किडीने. पंधरा दिवसांपूर्वीच एकदा फवारणी केली होती. आता पुन्हा करायची वेळ आली आहे." 

कपाशी, मका, भुईमूग, अद्रक या पिकांची पाने  पावसाअभावी पिवळी पडत असल्याचेही शेतकरी सांगतात. शेतात तण वाढल्याने निंदणी, कोळपणी, फवारणीच्या कामांना वेग आला आहे. 

पावसाचा अंदाज 

मराठवाड्यातही पावसाचा जोर कमी झाला असून उघडीप असल्याचे दिसते. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार  नांदेड, परभणी ३१ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची  शक्यता आहे. वाऱ्याचा वेग तशी ३० ते ४० किमी असणार असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सांगितले आहे.  प्रादेशिक हवामान अंदाजानुसार, औरंगाबाद जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते माध्यम सारी कोसळण्याचा अंदाज आहे. 

 

टॅग्स :शेतकरीमोसमी पाऊसशेतीखतेपाऊसपीकपीक व्यवस्थापन