Join us

जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रात दौरा केला तेथील शेतीची स्थिती कशी आहे?

By दत्ता लवांडे | Published: October 24, 2023 9:06 PM

मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पुढारलेली शेती करतात असं बोललं जातं.

मागच्या जवळपास दीड ते दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने एका महिन्याचा अवधी मागितल्यानंतर त्यांनी सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला आणि महाराष्ट्र दौरा सुरू केला. त्यांनी २० आणि २१ ऑक्टोबर या दोन दिवसांत पुणे, सातारा, सोलापूर, नगर आणि बीड जिल्ह्यांत ८ सभा घेतल्या.  

मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी दोन दिवसांत राजगुरूनगर, बारामती, फलटण, दहिवडी, अकलूज, इंदापूर, कर्जत आणि बीड या ठिकाणी सभा घेतल्या. अंतरवाली सराटी येथील सभेला अभूतपूर्व गर्दी झाली. या सभेनंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सधन मराठ्यांच्या भागात घेतलेल्या सभाही गाजल्या. मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पुढारलेली शेती करतात असं बोललं जातं. पण पश्चिम महाराष्ट्रातील विशेष करून पुणे, सातारा, सोलापुरात जरांगेंनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या भागांतील शेतीची अवस्था आणि परिस्थिती काय आहे आपल्याला माहितीये का? चला तर सविस्तर जाणून घेऊया...

नारायणगाव

पहिली सभा झाली नारायणगाव येथे. जुन्नर तालुक्यातील हे गाव. खरं म्हणजे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला मोठं करण्यात ज्या नदीचा वाटा जास्त आहे ती भीमा नदी खेड तालुक्यातून वाहते. भीमाशंकर येथे उगम झाल्यानंतर पुणे, सोलापूर आणि पुढे कर्नाटकमध्ये प्रवेश करते. खेड, मंचर, राजगुरूनगर, नारायणगाव, जुन्नर हा तसा सधन, पुढारलेल्या शेतकऱ्यांचा पट्टा. कुकडी, चास कमान, वडज, डिंभे हे सह्याद्रीला खेटून असलेले धरण या परिसराचे कणा आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या भामा आसखेड या धरणाचं पाणी आता पुणे शहरासाठी वापरलं जाणार आहे. पण बाकीच्या धरणांमुळे या पट्ट्यात सुधारित सिंचन पद्धती, पिके, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीकडे पाहण्याचा व्यवसायिक दृष्टीकोन असणारे शेतकरी आहेत. यंदा येथील धरणे जरी भरले असले तरी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे भाताच्या पिकांवर परिणाम झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.  

हा पट्टा म्हणजे तरकारी पिके (भाजीपाला पिके) काढणारा पट्टा. येथील जमीनही सुपीक. टोमॅटो, बटाटा, कांदा, लसूण, भाजीपाला पिकांसाठी हा भाग ओळखला जातो. सह्याद्रीच्या पायथ्याला नाचणी, भातांसारखे पिके घेतले जातात. पण येथील बटाटा आणि टोमॅटो देशभरात पोहोचतो. या बटाट्याला देशभरातून मागणी असते. म्हणून येथे बटाटा संशोधन केंद्रसुद्धा आहे. त्याचबरोबर कांदा-लसूण संशोधन केंद्रसुद्धा राजगुरूनगर येथे आहे. भीमेच्या पट्ट्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून भीमाशंकर साखर कारखाना याच उसाच्या क्षेत्रावर अवलंबून आहे. पुणे, मुंबईसारख्या बाजार समित्यातील बहुतांश व्यापारी याच पट्ट्यातील आहेत हे विशेष. राज्यभरातून अनेक शेतकरी या भागांतील शेती पद्धती पाहण्यासाठी येत असतात. 

बारामती

बारामती हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत प्रगत शेतकऱ्यांचा पट्टा मानला जातो.  दुष्काळी तालुका असूनही शेतीत पुढारलेला तालुका म्हणजे बारामती. या तालुक्यातील शेती क्षेत्रांत अभूतपूर्व साकारात्मक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मुळात दुष्काळी तालुका असूनही या तालुक्यासाठी नीरा देवधर, नाझरे, वीर, खडकवासला ही धरणे महत्त्वाची आहेत. नीरा देवधर धरणातून आलेल्या डाव्या कालव्याचे पाणी बारामती शहर आणि शेतीसाठी वापरलं जातं. बारामतीच्या पूर्व भागात काही प्रमाणात उजनी धरणाचंही पाणी आहे. एकंदरीत महाराष्ट्रात सरासरी पाऊस कमी पडला असला तरी बारामती फलटण या तालुक्यांना पाणी पुरवठा करणारे धरणे भरले असल्यामुळे या भागांत पाणी कमी पडणार नसल्याची शक्यता आहे. पण मुळात पाऊस कमी पडल्यामुळे उस शेतीला काहीसा फटका बसल्याचं चित्र आहे.

उस हे इथलं प्रमुख पीक. उसाच्या, दुधाच्या आणि फळबागांच्या जीवावर सहकार क्षेत्रात मोठी झेप बारामतीने घेतली आहे. उसाबरोबरच येथील प्रत्येक शेतकऱ्यांकडे दुध उत्पादनासाठी गायी असून दूध उत्पादनात बारातमती पुढारलेला तालुका आहे. डाळिंब, द्राक्षे, सिताफळ, अॅप्पल बोरांच्या बागा या भागांत पाहायला मिळतात. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील नवनवे प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरूनही शेतकरी येत असतात. येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे झालेल्या संशोधनामुळे शेतीमध्ये मोठमोठे बदल झाले आहेत. प्रक्रिया उद्योगही मोठ्या प्रमाणावर विकसित झालेले आहेत. मेंढीपालनाचा व्यवसाय या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो. सोमेश्वर आणि माळेगाव साखर कारखाने येथील मुख्य साखर कारखाने आहेत. याद्वारे विक्रमी उसाचे गाळप या कारखान्यांकडून होत असते. राज्यभरातल्या विविध ठिकाणाच्या उसतोड कामगारांची रीघ या भागांत लागलेली असते.

फलटण

बारामतीलाच लागून असलेला तालुका म्हणजे फलटण. फक्त बारामती पुण्यात तर फलटण साताऱ्यात एवढाच काय तो फरक. दोन्ही तालुक्यातील शेतीमध्ये जास्त बदल नाही. दोन्हीही तालुक्यातील पावसाचे अत्यल्प प्रमाण पण सिंचनाची प्रगत पद्धती येथे आहेत. नीरा देवधर, धोम बलकवडी हे धरणे या तालुक्यासाठी जीवनदायी ठरले आहेत. नीरा देवधर धरणाच्या उजव्या कालव्याचं पाणी फलटण भागासाठी मिळतं. त्याचबरोबर धोम बलकवडी धरणाच्या कालव्याचं पाणीही फलटणला मिळत असल्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न कमी आहे. 

उस, दुधाचा व्यवसाय आणि डाळिंबासारख्या फळबागा हे इथल्या शेतकऱ्यांकडे सर्रासपणे दिसतात. बारामती पाठोपाठ दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर फलटणमध्ये केलं जातं. तर उसामुळे येथील शेतकऱ्यांची चांगली प्रगती झाल्याचं पाहायला मिळेल. श्रीराम सहकारी साखर कारखाना, श्रीदत्त इंडिया साखरवाडी साखर कारखाना, शरयू साखर कारखाना, स्वराज्य साखर कारखाना असे चार कारखाने या तालुक्यात असून येथे विविध भागांतून उसतोड मजूर येत असतात. बारामती आणि फलटण हे दोन्हीही तालुके तसे सधन शेतकऱ्यांचेच तालुके म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

इंदापूर

उजनी आणि भीमा नदीने दोन्ही बाजूने वेढलेला तालुका म्हणजे इंदापूर. उस हे येथील प्रमुख पीक. उजनी हे महाराष्ट्रातील शेतीसाठी पाणी वापरासाठी असलेलं प्रमुख मोठी धरण आहे. उजनीने खूप मोठे क्षेत्र व्यापले असून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील शेतीसाठी या पाण्याचा वापर होतो. पण यंदाचा विचार केला तर उजनी धरण फक्त ६० टक्के भरले असल्यामुळे पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर  परिसरातील उस शेतीलाही फटका बसला आहे.

दरम्यान, फलटण, बारामतीप्रमाणे या भागांतही मोठ्या प्रमाणावर उस शेती असून या एकाच तालुक्यात तब्बल ४ साखर कारखाने आहेत. श्री छत्रपती साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना, नीरा-भीमा साखर कारखाना, बारामती अॅग्रो ही साखर कारखाने या तालुक्यात आहेत. त्याचबरोबर डाळिंबाच्या बागा या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात. पुण्यासारखी बाजारपेठ जवळ असल्यामुळे या भागांतील शेती प्रगत असून शेतकरीसुद्धा प्रगत आहेत.

दहीवडी

दहीवडी हे पूर्णपणे दुष्काळी गाव. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचं हे मुख्यालय. या तालुक्यातील मान्सूनच्या पावसापेक्षा वळवाचा पाऊस जास्त पडतो. यावर्षी राज्यभर सरासरी पाऊस कमी पडल्यामुळे दहीवडी भागाची परिस्थिती बिकट आहे. खरिपात या भागांत प्रामुख्याने बाजरीचं पीक घेतलं जातं. त्याचबरोबर मूग, उडीद यांसारखे कडधान्य पीके येथे घेतली जातात. तर उन्हाळ्यात हरभरा, ज्वारीसारखे पीके घेतली जातात. काही शेतकरी हळद, आले, कांद्यासारखी पिके पाण्याच्या उपलब्धतेनुसार करताना पाहायला मिळतात.  पहिल्यापासूनच दुष्काळ असल्यामुळे या भागांतील अनेक लोकं कामधंद्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. रंगकाम आणि सोन्याचा व्यापार करणारे लोकं या भागांत आढळतात. या दुष्काळी पट्ट्यातील नागरिक देशभर सोन्याचा आणि रंगकामाचा व्यापार करताना आढळतात. 

माळशिरस

माळशिरस हा सोलापूर जिल्ह्यातला आणि इंदापूरच्या सीमेला लागून असलेला तालुका आहे. या तालुक्यात मिश्र पद्धतीची शेती पाहायला मिळते. निरा नदीचे आणि उजनीचेही पाणी या तालुक्यातील काही भागांतील शेतीसाठी उपयुक्त ठरते. उस, फळबागा आणि खरिप रब्बी पिकांचेही या भागांत उत्पादन होते. तरत यंदा पावसाने दडी मारल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतीलाही फटका बसला आहे.

तसं पाहिलं तर मनोज जरांगे यांच्या मराठवाडातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील या भागांतील शेतकरी आणि शेतीमध्ये मोठा बदल आहे. जरांगेंच्या दृष्टीकोनातून विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील हा सगळा पट्टा घरंदाज, मजबूत मराठ्यांचा आहे. शेतीमध्ये प्रगती केलेले शेतकरी येथे आढळून येतात. तर मराठवाड्यात उस, कापूस, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, मूग, उडीद यांसारखे पीके घेतली जातात पण पाण्याचा, सिंचन पद्धतीचा, तंत्रज्ञानाचा, उत्तम बाजारपेठेचा आणि ज्ञानाचा अभाव मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी शेतीमध्ये प्रगती करण्यास मागे राहिलेले आहेत हे वास्तव आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणेसोलापूरसातारा परिसरमनोज जरांगे-पाटील