हिंगोली येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या वाहनांना आवारात सोडण्यावरून काही शेतकरी व बाजार समितीचे सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांत शनिवारी सकाळी वाद झाला. या ठिकाणी उपस्थित व्यापाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर हा वाद निवळला.
येथील संत नामदेव मार्केट यार्ड हळद खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे हिंगोलीसह परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, रिसोड भागातील शेतकरी हळद विक्रीसाठी घेऊन येत आहेत. सध्या भावही समाधानकारक असल्यामुळे सरासरी चार ते पाच हजार क्विंटलची आवक होत असून, मार्केट यार्ड आवाराबाहेरील रस्त्यावर देखील वाहनांच्या रांगा लागत आहेत.
एका दिवसात मोजमाप होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा एक ते दोन दिवस मुक्काम पडत आहे. त्यामुळे गुरुवार, शुक्रवारपासून हळद व विक्रीसाठी घेऊन आलेल्या वाहनांना न शनिवारी सकाळी मार्केट यार्ड व आवारात प्रवेश देण्यावरून शेतकरी व न बाजार समितीचे सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांत वाद उद्भवला. यावेळी या ठिकाणी उपस्थित व्यापारी व इतर न शेतकऱ्यांनी दोघांचीही समजूत घातली. त्यानंतर रांगेतील वाहने नंबरनुसार मोजमापासाठी पाठविण्यात येत होती.
सोयाबीनचे भाव गेले तळाला; उत्पादन खर्च ही हाती पडेना
बाजार समितीने वजन काटे वाढवावेत...
मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या येथील मार्केट यार्डात हळदीची विक्रमी आवक होत आहे.
सध्याच शेतकऱ्यांना हळदीचा काटा होत नसल्याने एक ते दोन दिवस मुक्काम करावा लागत आहे.
येणाऱ्या दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार समितीने काट्यांची संख्या वाढवावी. तसेच हळदीचा काटा एका दिवसांत होईल, या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
तोंड पाहून वाहने सोडण्यात येत असल्याचा आरोप
हळद मार्केट यार्डाच्या गेटच्या बाहेर शेकडो वाहनांची रांग लागली असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुरक्षारक्षक कर्मचारी मात्र तोंड पाहून वाहने आतमध्ये सोडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.
या प्रकारावरून शनिवारी वाद उद्भवल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. अन्यथा वाहने सोडण्यावरून दररोजच वाद उद्भवण्याची शक्यता आहे.