Join us

कृषि प्रक्रिया उद्योग उभारणी हि काळाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 7:20 PM

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड छत्रपती संभाजीनगर द्वारे ९२ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम दिंनाक १ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड छत्रपती संभाजीनगर द्वारे ९२ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम दिंनाक १ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रकाश देशमुख हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस 4 एस टेक्नोलॉजीस, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कृषि विद्या अधिकारी गणेश कुटे आणि केव्हीके, छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख डॉ. किशोर झाडे हे होते. तसेच यावेळी केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजूला भावर, डॉ. अनिता जिंतुरकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. देशमुख म्हणाले कि, भविष्यातील वाढत्या मागणीनुसार अन्नधान्य प्रक्रियेला खूप महत्व आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी यांनी अन्नधान्य, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कृषि पदवीधरांसाठी तर प्रक्रिया उद्योग ही खूप उत्तम संधी आहे. ‍केवळ प्रक्रिया करूनच नाही तर त्यामध्ये पुढे जाऊन मार्केटींग व त्या वस्तूचे स्वतःचे ब्रँडीग करणे गरजेचे आहे. समाजातील विविध घटक म्हणजे शेतकरी महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यातील योग्य समन्वयाने खूप चांगल्या प्रकारे प्रक्रिया उद्योग उभा करता येतो. तृणधान्यामध्ये देखील प्रक्रिया उद्योगाला प्रचंड संधी आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, असे कृषि प्रक्रीया उद्योगासाठी शासनाच्या विविध योजनांचे पाठबळ देण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा व प्रक्रिया उद्योगांची उभारणी करावी. परंतु यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना श्री. कुटे म्हणाले की, शेतकऱ्यांना, महिला भगिनींना एकत्रित करुन त्यांना प्रक्रिया उद्योगातील विविध संधी उपलब्ध करुन देणे आणि ग्रामीण स्थरावरच रोजगार उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी एस 4 एस टेक्नोलॉजीस काम करत आहे. या कामामध्ये जवळपास ८०-९० % महिलांचा सहभाग आहे. सोलार ड्रायर च्या माध्यमातून १० पेक्षा अधिक भाजीपाला व १० पेक्षा अधिक धान्यांवर प्रक्रिया करून उद्योग उभारणी चे उद्योग मॉडेल एस 4 एस टेक्नोलॉजीसद्वारे विकसित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे. भाजीपाला प्रक्रियेवर खुप संधी आहेत सोलार कन्डीशन ड्रायरद्वारे ४० प्रकारच्या भाजीपाला पिकावर प्रक्रीया करु शकतो. अशा प्रकारचा उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांनी एस 4 एस कंपनीशी संपर्क करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नैसर्गिक शेती यावर मार्गदर्शन करताना डॉ. झाडे म्हणाले की, नैसर्गिक शेतीमध्ये बिजामृत, जीवामृत, वापसा नियोजन आणि पीक आच्छादन या पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच विषमुक्त खाद्य निर्मिती करण्यासाठी नसर्गिक शेती अत्यंत महत्वाची आहे. यावेळी प्रगतशील शेतकरी दादासाहेब शिंदे, उद्धव शिरसाठ, सुदर्शन पोफळे, श्री. राठोड, विकास लोळगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. बस्वराज पिसुरे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. संजूला भावर यांनी आभार प्रदर्शन केले.

टॅग्स :कृषी विज्ञान केंद्रवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठशेतकरीपैठणमहिला