Join us

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने केव्हिके नारायणगाव इथे पाककला स्पर्धेचे आयोजन

By बिभिषण बागल | Updated: July 29, 2023 18:51 IST

भरडधान्य पिकांचे क्षेत्र कमी होत आहे. पारंपरिक पिके असलेली ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ, राजगिर आदी विविध अन्न धान्याचा जगभरात प्रचार प्रसार व्हावा.

चालू वर्ष हे पौष्टिक भरड धान्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून जगभरात साजरे केले जात आहे. शिरूर येथील कान्हूर मेसाई गावात कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि टीव्हीएस एस एस टी यांच्या संयुक्त विद्यमाने भरडधान्य पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान तज्ञ निवेदिता शेटे, कृषी विस्तार तज्ञ राहुल घाडगे, टीव्हीएसकडून सोमनाथ काटकर, आरोग्य सल्लागार वनिता केदारी, मालन जाधव, पुष्पा लंके, कान्हूर मेसाई सरपंच चंद्रभागा खर्डे, ग्रामपंचायत सदस्य संगीता पुंडे, आशिया तांबोळी आदी महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भरडधान्य पिकांचे क्षेत्र कमी होत आहे. पारंपरिक पिके असलेली ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ, राजगिर आदी विविध अन्न धान्याचा जगभरात प्रचार प्रसार व्हावा आणि त्या पासून बनविले जाणारे रुचकर पदार्थ सर्वांच्या जिभेवर रेंगाळावे आणि त्यामध्यामातून वयोवृध्द स्त्री-पुरुष, लहान मुले, गरोदर स्त्रिया, स्तनदा महिला आदींचे योग्य पोषणाने आरोग्य सुधारावे हा उद्देश समोर ठेऊन कृषी विज्ञान केंद्राने या पाककृती स्पर्धेचे आयोजन केले असे प्रतिपादन केंद्राचे कृषी विस्तार विषयतज्ञ राहुल घाडगे यांनी केले.

यावेळी केंद्राच्या गृह विज्ञान विषयतज्ञ निवेदिता डावखर शेटे यांनी भरडधान्य पिकांचे आहारातील महत्व विषद केले आणि जास्तीत जास्त पदार्थ बनवून खाण्याचे आवाहन केले. यावेळी आयोजित केलेल्या पोष्टिक भरड धान्य पाककृती स्पर्धेत विविध ५० हून अधिक पदार्थ महिलांनी बनवून आणले. यामध्ये विशेषत: ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ, रजगिरे आदीपासून बनविलेले थालीपीठ, ज्वारी इडली, घावणे, सारणाच्या पुऱ्या, सांजोर्‍या, बाजरी वडे, खरोड्या, चकल्या, राळ्याची खीर, ज्वारीची खिचडी, वरईचे अप्पे, नाचणी बर्फी असे पारंपारिक रुचकर पदार्थ तयार करून आणले होते.

विविध धान्यांचा वापर करून पौष्टिक पदार्थ बनविण्याचे पाककौशल्य दाखवणाऱ्या महिलांचा उस्फुर्त सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला. ५० हून अधिक महिलांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. यावेळी स्पर्धेत सहभाग नोंदवून अतिशय रुचकर, नावीन्यपूर्ण आणि बाजारभिमुख पदार्थ बनवून आणणाऱ्या शारदा मिडगुळे यांचा प्रथम, तर ७२ वर्षीय आजी सिंधुताई घोलप यांचा द्वितीय, तर ७० वर्षीय आजी लक्ष्मी सोनटक्के यांच्चा  तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, आंब्याच रोपट, पोषणबाग किट व धान्य साठविण्याची पिशव्या भेट देऊन गौरविण्यात आले.

गृहविज्ञान तज्ञ निवेदिता शेटे आणि पुष्पा लंके यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले आणि पदार्थांचे मूल्यमापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महिलांना त्यांच्या दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करण्यासाठी आणि निरोगी स्वयंपाक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोमनाथ काटकर तर आभार शारदा मिडगुले यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :अन्नमहिलानारायणगावशेतकरी