Join us

'सहकार से समृध्दी' ते जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना! 'सहकार'च्या बैठकीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 20:04 IST

बाबासाहेब पाटील यांनी सहकार मंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर सहकार खात्याअंतर्गत सहकार आयुक्त, साखर आयुक्त, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या कामकाजाचा विस्तृत आढावा यावेळी घेतला.

Pune : वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांची पिके आणि फळबागांचे संरक्षण होण्यासाठी शेतकुंपण करण्याकरीता स्वंतत्र योजना तयार करुन शासनास सादर करावी अशी सूचना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवार (ता. ०९) रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास केली. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या साखर संकुल येथे झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ते बोलत होते.

केंद्र शासनाच्या प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी "सहकार से समृध्दी" या अभियानाअंतर्गत विविध व्यवसाय सुचविण्यात आले आहेत. त्यातील "जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना" प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांकरीता प्राधान्याने राबविण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने प्रयत्न करावेत. या योजनेमध्ये केंद्र शासनामार्फत देण्यात येत असलेल्या अर्थसहाय्य व्यतिरिक्त राज्य शासनातर्फे प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांना जादाचे अर्थसहाय्य देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा. या योजनेतून निर्माण होणाऱ्या गोदामांचा वापर धान्य साठवूणक, शेतमाल तारण योजना तसेच निविष्ठा विक्री व्यवसायासाठी प्राधान्याने होईल याबाबीकडे लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी केल्या.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास नॅशनल कोऑपरेटीव ऑग्रेनिक लिमीटेड, (NCOL) आणि नॅशनल कोऑपरेटीव एक्सपोर्ट लिमीटेड (NCEL) या केंद्र शासनाच्या कंपन्यांच्या राज्यातील कामकाजासाठी नोडल एजन्सी नियुक्त केले असून या केंद्र शासनाच्या कंपन्यांमार्फत जास्तीतजास्त व्यवसाय राज्यातून होईल यासाठी महामंडळाने वरील कंपन्यासोबत आवश्यक सांमजस्य करार आणि अॅग्रीमेंट करावे अशी सूचना यावेळी  बाबासाहेब पाटील यांनी केली.

बाबासाहेब पाटील यांनी सहकार मंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर सहकार खात्याअंतर्गत सहकार आयुक्त, साखर आयुक्त, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या कामकाजाचा विस्तृत आढावा यावेळी घेतला.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या कार्यपुस्तिकेचे विमोचन आणि महामंडळाच्या तसेच साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभहस्ते आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी राज्याचे सहकार आयुक्त दिपक तावरे, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, खा. विशाल पाटील. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, सहकार आणि साखर आयुक्तालय आणि महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी