वाशिम जिल्ह्यात यंदा कपाशीची सरासरी १८ हजार १३ हेक्टरपेक्षा थोड्या अधिक क्षेत्रात पेरणी अपेक्षित होती. प्रत्यक्षात यंदा तब्बल २९ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली आहे.
हे क्षेत्र सरासरीच्या १६१.८१ टक्के आहे. त्यावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कपाशीकडे कल वाढत असल्याचे दिसत आहे. कपाशीची सर्वाधिक पेरणी मानोरा तालुक्यात झाली आहे.
मागील काही वर्षांत जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात प्रचंड घट दिसत होती. कपाशीला मिळणारे अल्पदर आणि लागवडीच्या खर्चामुळे शेतकरी या पिकाकडे पाठ फिरवत होते.
आता मात्र शेतकऱ्यांचा कपाशीकडे पुन्हा कल वाढू लागला आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि तूर या पिकांनंतर खरीप हंगामात सर्वाधिक लागवड कपाशीची होते.
जिल्ह्यात अंतिम पेरणी
अहवालानुसार कपाशीचे सरासरी क्षेत्र १८ हजार १३ हेक्टर पेक्षा थोडे अधिक आहे.
प्रत्यक्षात या पिकाची पेरणी २९ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.
पेरणीच्या निम्मे क्षेत्र मानोरा तालुक्यातच !
जिल्ह्यात प्रामुख्याने मानोरा, कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात कपाशीची पेरणी अधिक होते. मागील दोन वर्षापासून मात्र मानोरा तालुक्यात कपाशीचे क्षेत्र वाढत आहे. यंदा जिल्ह्यात झालेल्या कपाशीच्या पेरणीतील निम्मे क्षेत्र मानोरा तालुक्यातच आहे. या तालुक्यात सरासरी १ हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना प्रत्यक्ष १४ हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली.
वाशिम तालुक्यातही वाढले क्षेत्र
मानोरा तालुक्यासह यंदा वाशिम तालुक्यातही कपाशीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. वाशिम तालुक्यात सरासरी १६५.६० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना प्रत्यक्ष १ हजार ८३१ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली. त्याशिवाय मंगरुळपीर आणि रिसोड तालुक्यातही कपाशीचे क्षेत्र वाढले. मालेगाव आणि कारंजा तालुक्यात मात्र यंदा कपाशीचे क्षेत्र घटले आहे.
तुरीची पेरणीही ६६ हजार हेक्टरवर
जिल्ह्यात यंदा कपाशीसह तुरीच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ५९ हजार क्षेत्रावर तुरीची पेरणी अपेक्षित असताना ६६ हजार पेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली.
कोणत्या तालुक्यात किती हेक्टरवर कपाशी
तालुका | क्षेत्र |
वाशिम | १८३१.०० |
रिसोड | २७८.०० |
मालेगाव | ५८९,०० |
मंगरुळपीर | २३५७,०० |
मानोरा | १४,५९१.०० |
कारंजा | ९६८३.०० |