मागील पंधरा दिवसांपासून परतीचा पाऊस काही पाठ सोडत नाही. त्यामुळे हवामानात बदल झाला आहे. परिणामी कापूस व इतर पिकांवर विविध रोग पडत असून, पाने लाल होऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी परिसरातील अनेक गावांत परतीचा पाऊस अधिक झाला. त्यामुळे जमिनीत पाणी साचून राहिले आहे. जमीन चिभडून गेली आहे. यामुळे कापूस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. दमट हवामानामुळे सध्या अळ्या व किडींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नाही. कृषी विभागाने वेळीच शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कापसाला नवीन बोंड येण्यास सुरूवात झाली असतानाच पाने गळत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. पानगळती झाल्यास झाडाची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया थांबून वाढ खुंटते. बोंड गळण्याची शक्यता असते. यामुळे उत्पादनात कमालीचे घट होऊ शकते.
रोगग्रस्त पिकांवर वेळीच फवारणी करावी
दमट हवामानामुळे कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच हवामान बदलामुळे तूर, कापूस व इतर भाजीपाला पिकांची पाने लाल होऊन गळून पडत आहेत. अशावेळी नॅनो युरिया किवा नॅनो डीएपी ५० मिलीसोबत आंतरप्रवाही बुरशीनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच प्लानोफिक्स ४.५ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : Amla Health Benefits : बलवर्धक आवळा खा; रोगप्रतिकारकशक्ती वाढवा