Join us

Cotton Crop : अतिवृष्टीमुळे कपाशी पीक हातून जाणार का; कसे करावे हाच प्रश्न  वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 7:25 PM

सततच्या पावसामुळे कपाशी पिकात पाणी गेल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. अतिवृष्टीचा पिकांवर काय परिणाम झाला वाचा सविस्तर (Cotton Crop)

अमित पाटील

मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कपाशी पिकात पाणी गेल्याने पिकाची वाढ खुंटली आहे, पिकाची पाने देखील पिवळी पडली आहेत.  शेतकऱ्यांनी पीक वाढण्यासाठी फवारणी करून सुद्धा सततच्या पावसामुळे फवारणीचा फरक जाणवत नाही.

जवळपास बऱ्याच शेतात वाढ न झालेल्या कपाशीच्या पिकाला फुले पाते लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाढ न झालेल्या कपाशीच्या पिकाला किती फुल पात्या येणार व किती उत्पन्न होणार, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. 

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सततच्या पावसामुळे शेतकरी वैतागला आहे. यंदा जूनमध्ये कपाशी पिकाची पेरणी होऊन सुद्धा सप्टेंबर आला तरी पिकाला सात-आठ पानेच लागली आहे.

दरवर्षी सप्टेंबरमध्ये कपाशीला फुले, पात्या, पंधरा-वीस कैऱ्या लागलेल्या असतात. परंतु यंदा पिकांची वाढच झाली नसल्याने फुले, पात्या व दोन-तीन कैऱ्या लागलेल्या दिसत नाहीत.

पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या भरवशावर घेतलेले कर्ज फेडायचे होते. परंतु सततच्या पावसामुळे अडचणीत भर पडली आहे. - राजेंद्र तेलगोटे, शेतकरी, नवथळ

यंदा पेरणी झाल्यापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पिकांना अपेक्षित सूर्यप्रकाश मिळाला नाही. त्यामुळे पिकाची वाढ झाली नाही. त्यामध्ये तण व रोगराईचे प्रमाण वाढले. परिणामी, शेतकऱ्यांनी खर्च करून देखील पिकाची वाढ न झाल्याने उत्पन्नात कमालीची घट निश्चित आहे. - नामदेव फुकट, शेतकरी, आगर

सततच्या पावसामुळे कपाशीसह इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. पिकाला लावलेल्या खर्च देखील निघणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी.- सुनील तेलगोटे, शेतकरी, नवथळ

महिन्यापासून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी शासनाने तातडीने आर्थिक मदत करवी. - बाळू तेलगोटे, शेतकरी, नवथळ

'ओला दुष्काळ जाहीर करा!'

■ कपाशी, सोयाबीन व तूर पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी व शेत मजुरांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

■ यावर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी दोन-तीन वेळा निंदणी, फवारणी, डवरणी व खतांवर खर्च केला. तरीदेखील सततच्या पावसामुळे कपाशी पिकाने पाणी धरले व पिकांची वाढ झाली नाही. पिकापासून किती उत्पन्न होणार, खर्च देखील निघणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसपीकशेतकरीशेती