रविंद्र शिऊरकर
रविवारी (दि.२६) रात्रीपासून ते सोमवार दुपारीपर्यंत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कनक सागज (ता. वैजापूर) भागातील अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मजुरांच्या अभावी तसेच रब्बी पिकांच्या लागवडीमुळे शेतकरी विविध कामात व्यस्त आहेत. ज्यामुळे कपाशी वेचणीची कामे मागे पडली असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीला बोडें तशीच आहे. रविवारी आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे कपाशीच्या झाडांच्या कापसाच्या वाती झालेल्या दिसून येत आहे.
खर्च बघता नफा नाही
१००० - १५०० रुपये किंमतीचे बियाणे, शेतीची नांगरट, कपाशी लागवड साठी सरी पाडणे, लागवड, उतार न झालेल्या ठिकाणी फेर लागवड, दाणेदार खते, किटकनाशकांची फवारणी, वखरणे, कापूस वेचणी, साठवणूक, आणि विक्री अशा कित्येक फेऱ्या कपाशीसाठी शेतकऱ्यांना कराव्या लागतात. त्यातूनही मध्यम जमिनीत ३ ते ७ व चांगल्या जमिनीतून ७ ते १० क्विंटल एकरी कापूस मिळतो. एकरी ८ ते १० हजार खर्चून त्यात अवकाळी दुष्काळी संकटांना तोंड देत हाती काहीच राहत नसल्याने शेतकरी मोठ्या विवंचनेत आहेत.
रात्रीच्या पावसाने कापसाच्या वाती झाल्या असून जवळपास ३ क्विंटल कापसाचे नुकसान झाले आहे. उत्पन्न कमी असून पण या वर्षी कापसाला भाव नाही शासनाने आता तरी कापसाचे भाव वाढवावे. तसेच शासनाने लवकर पंचनामे करून पीक विमाचे पैसे देत मदत करावी. अन्यथा शेतकरी आता शेती करायचं सोडून देईल. - बाळकृष्ण धाटबळे शेतकरी कनक सागज ता. वैजापूर
अवकाळी पाऊस, उत्पन्न कमी त्यात दर नाही
आस्मानी संकट शेतकऱ्यांना नवीन नाही. मात्र चालू वर्षी आधीच खरिपात पावसाने दांडी दिल्याने कपाशीचे उत्पन्न घटले असून त्यात कपाशीला गेल्या वर्षीच्या १०००० रुपये प्रति क्विंटलच्या तुलनेत दर नाही. त्यात आता अवकाळी पावसाने झाडाला असलेल्या कापसाच्या वाती केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे ओले दुष्काळ उभे ठाकले आहे. पीक विमा भरून देखील ते पंचनामे वेळेत होत नाहीत. कधी विमाच मिळत नाही. आता सरकारने लवकरात लवकर शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.