रविंद्र शिऊरकर
रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर झालेल्या अवकाळी पावसाने खरीप जमिनीची ओलाव्याची झिज भरून काढली खरी. मात्र, वेचणीला आलेल्या कापसाची नासधूस झाली. आधीच ओल नसल्याल्या परिस्थितीत वाढलेल्या कापसाला अवकाळी पावसाने मातीमोल केले. मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या कपाशीचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
खरीपात संपूर्ण जून महिना कोरडा ठाक गेला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला काहीसे पोषक वातावरण तयार झाली. मात्र, सलग दीड महिना पावसाचा खंड पडला. सावकारी कर्ज, उसनवारी, तर काहींनी आपल्या पत्नीचे सोनं गहाण ठेवतं पैशांची जोडाजोड केली. बियाणे घेतले. मराठवाडा, विदर्भात कापसाची पेरणी झाली. कापसाच्या वेचणीसाठी डोक्याला रुमाल बांधून महिलांची लगबग सुरू असतानाच दुसरीकडे रब्बी पेरण्यांचीही तयारी सुरू होती. परिणामी, कापसाच्या वेचणीची कामे काहीशी मागे पडली. अवकाळी पावसाने आणि गारपीटीने मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना आगीतून फुफाट्यात पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
पांढरं सोनं काळवंडलं! गतवर्षीच्या तूलनेत कपाशीत यंदा दोन हजारांची घट
हातातोंडाशी आलेल्या कापूस अवकाळी पावसाने काळवंडला आहे. भिजलेला कापूस घेण्यास आता व्यापारी नकार देत आहेत. अगदी कवडीमोल दराने कपाशी विकून पेरणीचा खर्च निघेल का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कमी पावसाने मराठवाडा विदर्भातील भूजल पातळी आधीच खालावली असताना पावसाच्या तऱ्हांनी रब्बी पिकांची पेरणी राहीली आहे.
माझी ५ एकर शेती आहे. खरीप हंगामात कापसाची ३ एकर क्षेत्रावर लागवड केली होती. उर्वरित क्षेत्रात मका, भुईमूग, मूग पिकं घेतली. पाण्याअभावी मक्याची वाढ खूंटली. केवळ वाढ न झालेला चारा हाती आला. भुईमूग, मूग तर बघायलाही नाही मिळाले. सोबत आता सरकारी योजनेतून ठिबक सिंचन घेऊन त्याद्वारे एक एकर कपाशी चांगल्या प्रकारे जोपासली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे ती देखील आता जमिनीवर पडली आहे. त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळणे अवघड झालंय. आता सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी किंवा काही तरी आर्थिक मदत करावी तरचं शेतकरी जगेल. - गणेश पडुळ शेतकरी कलंकी ता. कन्नड जि. छ्त्रपती संभाजीनगर
जुलैमध्ये पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; पण नंतर पावसाने आखडते घेतल्याने पाण्याविना पिके सुकून गेली. ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार पाणी आहे, त्यांनी पाण्यावर कपाशी बहरात आणली. वेचणीला आलेला कापूस अवकाळी पावसात भिजला. रविवारी (दि.२६) रात्री आणि सोमवारी दिवसभर अवकाळी पाऊस आणि विजेचा कडकडाट झाला. ज्यात उभे असलेले कपाशीचे झाडे जमीनदोस्त झाली तर काही ठिकाणी कापसाच्या पाण्यात भिजल्याने वाती झाल्या. खर्चही न निघणाऱ्या कपाशीच्या अवकाळीने झाल्या वाती
कपाशीला गेल्या वर्षीच्या १०००० रुपये प्रति क्विंटलच्या तुलनेत दर नाही. त्यात आता अवकाळी पावसाने झाडाला असलेल्या कापसाच्या वाती केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे ओले दुष्काळ उभे ठाकले आहे. पीक विमा भरून देखील ते पंचनामे वेळेत होत नाहीत. कधी विमाच मिळत नाही. आता सरकारने लवकरात लवकर शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावा अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.