परतीच्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा परिसरात कापूस पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनही घटले. तर, दुसरीकडे कापसाला प्रति क्विंटल ७ हजारांपेक्षा अधिक भाव मिळत नाही. मात्र, कापूस वेचणीसाठी मजुरांना प्रति क्विंटल १५०० ते १७०० रुपये द्यावे लागत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
बाबरा परिसरात यावर्षी जून महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली. यासोबतच मका आणि आल्याच्या क्षेत्रातही वाढ झाली. त्यानंतर पाऊसही समाधानकारक झाला. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा मुसळधार पाऊस झाल्यामुळे कापसासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे कापूस पिकाचे उत्पादनही घटले.
तर, दुसरीकडे शासनाच्या मोफत रेशन आणि विविध आर्थिक लाभांच्या योजनांमुळे ग्रामीण भागात कापूस वेचण्यासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. मिळाल्यास प्रति क्विंटल १५०० ते १७०० रुपयांची मागणी शेतकऱ्यांकडे करत आहेत. याशिवाय शेतात ये-जा करण्यासाठी चारचाकी वाहनांची सोय शेतकऱ्यांना मजुरांना करून द्यावी लागते.
कापसाला प्रति क्विंटल ७ हजारांपेक्षा अधिक भाव मिळत नाही. त्यामुळे या पिकासाठी केलेला खर्चही यातून निघत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
एकरी असे मिळते उत्पन्न
यावर्षी कापसाचे एकरी उत्पन्न ४ ते ५ क्विंटलवर थांबले आहे. त्यात कापसाला सध्या केवळ प्रति क्विंटल ७ हजार रूपये दर मिळत आहे. ५ क्विंटलच कापूस पकडल्यास ३५ हजार रूपये मिळतात. यातून शेतकऱ्यांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.
... असा येतो एकूण खर्च
• शेणखत ६ हजार, नांगरणी दोन हजार, रोटाव्हेटर १ हजार २०० रूपये
• बियाणे दोन बॅग १ हजार ६०० रूपये, लागवड खर्च एक हजार रूपये
• निंदनी, वखरणी ८ हजार रूपये, वेचणी ४ हजार ५०० रूपये, फवारणी ८ हजार असा एकूण खर्च ३२ हजार ३०० रूपये येतो.
खर्चही निघेना
यावर्षी कापूस पिकासाठी ३२ हजारांपेक्षा अधिक खर्च झाला असून, उत्पन्न मात्र ३५ हजारांपेक्षा कमी मिळत आहे. याचाच अर्थ या पिकासाठी जो खर्च केला तोही निघाला नाही. यामुळे यापुढे कापसाचे पीक घ्यावे की नाही, असा शेतकरी विचार करत आहेत. - विनोद कुंटे, शेतकरी, बोधेगाव.