Pune : मराठवाडा आणि विदर्भातील कापसाची मोठ्या प्रमाणावर बाजारात आवक होताना दिसत आहे. पण कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकल्याचे चित्र आहे. एकीकडे मजूर मिळत नाहीत, दुसरीकडे कापसाला बाजारात योग्य दर मिळत नाही आणि तिसरीकडे मजुरांना एका किलोसाठी १० रूपये वेचणीला द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत खूपच कमी पैसे शिल्लक राहत आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रूपये क्विंटलचा दर जाहीर केला आहे. सध्या बाजारात केवळ ६ हजार रूपये प्रतिक्विंटल दर शेतकऱ्यांना मिळताना दिसत आहे. त्यातील १० ते १२ रूपये मजुरांनाच द्यावे लागत आहेत. मजुरांची कमतरता असल्यामुळे शेतकरी जास्त दरात मजुर लावून कापूस वेचणी करून घेतात. तर अनेक ठिकाणी एका किलोसाठी १५ रूपयेसुद्धा मोजावे लागत आहेत.
कापूस पूर्णपणे फुलल्यानंतर जास्त दिवस राहिला तर उन्हामुळे कापसाचे वजन कमी होते. त्यामुळे वेळेतच कापसाची वेचणी होणे शेतकर्यांच्या फायद्याचे ठरते. दरम्यान, बीड, लातूर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापसाच्या वेचणीसाठी मजुरांना १० ते १५ रूपये किलोंच्या दरम्यान पैसे द्यावे लागत आहेत.
पहिल्या टप्प्यातील कापूस येणाऱ्या दोन ते तीन वेचणीमध्ये संपण्याची शक्यता आहे. बरेच शेतकरी पहिल्या टप्प्यातील कापूस संपला की त्यामध्ये गहू किंवा इतर रब्बी पीके पेरण्यास प्राधान्य देतात. पहिल्या टप्प्यातील कापूस संपला की, संक्रांतीपर्यंत शेतकऱ्यांना पुढच्या बहाराची वाट पाहावी लागते. उन्हाळ्यात कापूस वेचणीचे दर १५ रूपयांच्याही पुढे असतात. पण बाजारभावांचा विचार केला तर शेतकऱ्यांन कमी दरात कापूस विक्री करावा लागत आहे.