Cotton Market :
नागपूर :
राज्यामध्ये येत्या १ ऑक्टोबरपासून ११० कापूस खरेदी केंद्रे सुरू केली जातील, अशी माहिती भारतीय कापूस महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला दिली आहे.
नागपूर शेतकऱ्यांकडील कापूस दिवाळीपूर्वी खरेदी केला जावा आणि कापूस खरेदीनंतर शेतकऱ्यांना सात दिवसांत चुकारा दिला जावा, याकरिता ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक (ग्रामीण) श्रीराम सातपुते यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
त्यावर न्यायमूर्तीद्वय भारती डांगरे व अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. दरम्यान, महामंडळाने ही माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने ही माहिती रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर १४ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.
तसेच, या तारखेला कापूस खरेदी केंद्रांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश महामंडळाला दिले. राज्यातील कापूस खरेदी केंद्रे दरवर्षी जाणीवपूर्वक विलंबाने सुरू केली जातात. त्यामुळे खासगी व्यावसायिक फायदा उचलतात.
ते गरजू शेतकऱ्यांकडून कमी दराने कापूस खरेदी करतात व महामंडळाची खरेदी केंद्रे सुरू झाल्यानंतर तो कापूस चढ्या दराने विकतात. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते, असा आरोप सातपुते यांनी याचिकेत केला आहे.