यवतमाळ : जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी संकलन केंद्राचा नाफेडकडून अद्यापही शुभारंभ झाला नाही. त्यामुळे वेचणीनंतर कापूस घरात आणणाऱ्या शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी खुल्या बाजारात कापूस विक्रीकरिता सुरवात केली आहे.
खेडा खरेदीच्या माध्यमातून ही कापूस खरेदी केली जात आहे. खासगी व्यापारी वाट्टेल त्या दरात कापसाची खरेदी करीत आहेत. यातून शेतकरी लुटला जात आहे. यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. यानंतरही या जिल्ह्याकडे शासकीय यंत्रणेकडून पूर्णतः दुर्लक्ष झाले.
आचारसंहितेपूर्वी कापूस खरेदीसाठी राज्य शासनाकडून तरतूद होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ती तरतूद झालीच नाही. त्यामुळे दरवर्षी धनत्रयोदशीला कापूस खरेदीचा शुभारंभ होणाऱ्या ठिकाणी यंदा मात्र शुकशुकाट होता.
परतीच्या पावसामुळे फुटलेला कापूस ओलाचिंब झाला. कापसात अधिक ओलावा असल्याने खुल्या बाजारात कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी तूर्त शुभारंभ लांबणीवर टाकला आहे.
शेतकऱ्यांच्या शेत शिवारात कापूस फुटला आहे. शेतकऱ्यांनी कापूस वेचणी सुरू केली आहे. दिवाळीचा सण आहे. यामुळे शेतात राबणाऱ्या मजुरांचे पैसे चुकते करता यावे, कृषी सेवा केंद्राची उधारी देता यावी, दिवाळीचा सण साजरा करता यावा, यासाठी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाजारात आणला आहे. बाजारात कापूस खरेदी करणारे केंद्रच नसल्याने शेतकरी घरपोच खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी पडलेल्या दरात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी सुरू केली आहे. खासगी व्यापारी हमीदराच्या खाली कापसाची खरेदी करीत आहेत. सहा ते साडेसहा हजार रुपये क्विंटल दराने हे कापूस खरेदी करीत आहेत.
११ केंद्रांवर ५ नोव्हेंबरपासून करणार नोंदणी
* जिल्ह्यात कापूस खरेदी करण्यासाठी नाफेडच्या जागेवर सीसीआय कापूस संकलन करणार आहे. तूर्त ओलाव्यामुळे कापूस संकलन केंद्रावर अडचणी येत आहे. संकलन केंद्रात ३० टक्के ओलावा आहे. किमान आठ टक्के ओलावा असणे बंधनकारक आहे.
* यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पांढरकवडा, खैरी, वणी, शिंदोला, कळंब, दारव्हा, दिग्रस, महागाव, पुसद आणि राळेगाव या संकलन केंद्रांवर कापूस खरेदी होणार आहे. प्रारंभी या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी घेतली जाणार आहे.
येत्या ५ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर ओलावा तपासून कापूस खरेदी केली जाणार आहे. सर्वच केंद्रांवर विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. - रामअवतार बुराडिया, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी, सीसीआय