Join us

Cotton Market : यंदा २२ लाख कापसाच्या गाठींची विदेशातून भारतात होतोय आयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 2:10 PM

राज्यात कापसाच्या (Cotton) नवीन हंगामातील मालाची आवक सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित भाव (Market Rate) नसल्यामुळे शेतकरी आपला माल बाजारात आणणे टाळत आहेत. त्यात सहा महिन्यांपूर्वी भारतातील गाठींचा दर आंतरराष्ट्रीय बाजारातील गाठींपेक्षा कमी होता.

अजय पाटील

जळगाव : राज्यात कापसाच्या नवीन हंगामातील मालाची आवक सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित भाव नसल्यामुळे शेतकरी आपला माल बाजारात आणणे टाळत आहेत. त्यात सहा महिन्यांपूर्वी भारतातील गाठींचा दर आंतरराष्ट्रीय बाजारातील गाठींपेक्षा कमी होता.

त्यामुळे स्थानिक बाजारातील व्यापाऱ्यांनी विदेशातील मालाला पसंती देऊन, सहा महिन्यांपूर्वीच तो माल बूक केल्यामुळे तब्बल २२ लाख गाठी यंदाच्या हंगामात भारताच्या बाजारात विदेशातून आयात होणार आहेत.

यामुळे भारतातील मालाच्या दरावर परिणाम झाला आहे. जानेवारीपर्यंत २२ लाख गाठींचा माल भारतात येणार आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात कापसाची मागणी वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यातच गेल्या हंगामातील सुमारे ११ लाख गाठी या सीसीआयकडे शिल्लक आहेत.

सीसीआयकडून या गाठी लवकरच लिलावात काढण्यात येतील, अशा परिस्थितीत कापसाचे दर वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे मत बाजारातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

स्थानिक बाजारात सुमारे ३३ लाख गाठींची मागणी झाली कमी 

• सहा महिन्यांपूर्वी भारताच्या कापसाच्या गाठींचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात ६० हजार ५०० रुपये खंडी इतके होते. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व ब्राझील या देशांच्या कापसाच्या गाठींचे दर ५३ ते ५४ हजार रुपये खंडी इतके होते. त्यामुळे स्थानिक बाजारातील सूत गिरणी चालक व कॉटन बाजारातील अनेक व्यावसायिकांनी कमी दरात असलेल्या कापसाच्या गाठींचे बुकिंग करून घेतले.

• भारतात २२ लाख कापसाच्या गाठी या दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व ब्राझील या देशांमधून येत आहेत. दुसरीकडे ११ लाख गाठी या सीसीआयकडे गेल्या वर्षीच्या शिल्लक आहेत. यंदाच्या हंगामात ३३ लाख गाठींची मागणी ही कमी झाली आहे. २२ लाख गाठींची विदेशातून आयात झाली नसती तर हीच मागणी स्थानिक बाजारातून वाढली असती. त्यामुळे कापसाच्या दरातही वाढ झाली असती.

• विशेष म्हणजे ३ सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कापसाच्या गाठींचा दर हा ५४ हजार रुपये खंडी इतका झाला आहे. दुसरीकडे भारताकडून होणारी कापसाची निर्यातदेखील थांबली आहे.

खान्देशात १ लाख गाठींची खरेदी

सद्यस्थितीत कापसाचे दर ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये क्विंटल इतके आहेत. त्यामुळे शेतकरी आपला माल विक्रीस आणणे टाळत आहेत. कापसाचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यातच हमीभावापेक्षा कमीचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. अशा स्थितीत सीसीआयकडून तरी कापसाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सीसीआयकडून खरेदी झाली तर शेतकऱ्यांना निदान हमीभावाइतका तरी दर मिळेल.

सध्या कापसाला स्थानिक बाजारात मागणी नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना सध्याचा दर परवडत नाही. त्यामुळे मालाची आवक थांबली आहे. जुन्या दरात स्थानिक बाजारात जी बुकिंग झाली होती. त्यामुळे २२ लाख गाठी या भारतात आयात केल्या जात आहेत. त्याचा परिणामही कापसाच्या दरावर झाला आहे. या परिस्थितीमुळे कापसाच्या दरात वाढ होणे शक्य दिसत नाही. - ललित भोरट, संचालक, खान्देश जिनिंग असोसिएशन. 

हेही वाचा :  Success Story : डाळबट्टी पिठातून उभारला शेती प्रक्रिया उद्योग; पळसगावचा प्रदीप करतोय वार्षिक ५० लाखांची उलाढाल

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकापूसबाजारजळगावमहाराष्ट्र