वऱ्हाडातील पाचही जिल्ह्यात कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात शेतकऱ्यांचा कापूसबाजारात येणार आहे. सध्या सरकीच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.
अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या पाच जिल्ह्यांत कपाशीची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या भागात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत.
मागीलवर्षी कापसाला कमी भाव मिळाला होता. अजूनही कापसाचे दर ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तीन वर्षांपूर्वी कापसाला १२ ते १३ हजार रुपये दर मिळाला होता. दोन वर्षांपासून मात्र भावात घसरण आली आहे.
यावर्षीचा कापूस पुढील महिन्यात येणार आहे. सध्या सरकीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कापसाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. सरकी व सरकी ढेपने यंदा उच्चांक गाठला आहे.
सरकीचे दर ४ हजार ३००, तर सरकी ढेप चार हजारांच्या वर गेली आहे. कापसाची गठाणही ६० हजारांवर पोहोचली आहे. यंदा पाऊस चांगला आहे. कापसाचे उत्पादनही चांगले होणार असल्याने कापसाला खुल्या बाजारात साधारणतः ७ हजार ५०० रुपये दर राहील, असा अंदाज आहे. व्यापाऱ्यांनी यावर्षी कापसाला चांगला दर मिळेल, अशी शक्यता वर्तविली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी केली कापसाची साठवणूक
कापसाचे दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली नाही. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे.ज्या शेतकऱ्याला गरज होती, त्यांनीच व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात कापूस विकला, व्यापाऱ्यांनी कापसाचा दर्जा पाहून ५ ते ६ हजार ८०० रुपये दर दिला होता. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे.