cotton picking : खारपाणपट्ट्यातील वरूर जउळका, लोतखेड, खापरवाडी, विटाळी, सावरगाव परिसरात दरवर्षी दिवाळीच्या आधीच कापूस शेतकऱ्यांच्या घरात येतो; मात्र यंदा सततच्या पावसामुळे पिकांवर परिणाम झाला असून, दिवाळी आली तरीही कापूस वेचणीचा मुहूर्त निघाला नाही.
त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. मागीलवर्षी दसऱ्याच्या जवळपास शेतकऱ्यांची कापूस वेचणीची लगबग सुरू झाली होती. त्यामुळे मजूरही मिळत नसल्याचे चित्र होते.
बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापूस आला होता; मात्र यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसामुळे कपाशी पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे बोंडेही उशिरा फुटली. परिणामी, दिवाळी तोंडावर आलेली असताना अद्यापही कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये आला नाही. या पावसामुळे कापूस काढणी हंगामही काही दिवस पुढे गेल्याचे शेतकरी सांगतात.
उडीद, मुगाचे पीक नामशेष
पेरणी झाल्यावर शेतकरी नगदी पीक म्हणून उडीद, मुगाला पसंती देत होते. या पिकाचे उत्पादन दिवाळीला कामी पडत होते; परंतु या पिकामुळे शेतात वन्य प्राण्यांचा त्रास वाढला होता. पिकाची पेरणी केली तर अंकुरलेले पीक वन्य प्राणी फस्त करीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावत होते. परिणामी, शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली.
मागील वर्षी दसरा झाल्यानंतर कापूस घरी आला होता; परंतु यावर्षी दसरा होऊन दिवाळी आली. तरीही कापूस घरामध्ये आला नाही. त्यामुळे दिवाळी अंधारात जाणार आहे. - दत्तात्रय आळंबे, शेतकरी, खापरवाडी
यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने कपाशी हिरवीगार आहे. कपाशीला बोंडे फुटायची बाकी आहेत. त्यामुळे दिवाळी आली तरीही कापूस घरामध्ये आला नाही.- उमेश कात्रे, शेतकरी, वरूर जउळका
यावर्षी शेतीला खर्च अधिक
यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे पिकांचा निंदण, खते, डवरणी खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी केली होती. हा खर्च काढण्यासाठी कापसाला चांगला दर मिळणे अपेक्षित आहे.
परराज्यातील मजूर परततोय!
सद्यःस्थितीत कपाशीला बोंड व पात्या चांगल्या प्रमाणात लागल्या आहेत. ऊन असल्याने बोंड्या फुटून कापूस वेचणीची लगबग वाढणार आहे. सध्या गावी गेलेले परराज्यातील मजूर परतत आहेत.