Join us

Cotton Picking : कापूस वेचणीला प्रारंभ; मजुरांसाठी करावी लागते पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 3:22 PM

आता शेतकऱ्यांना कापूस वेचणीचे वेग लागले. पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कपाशीकडून आशा आहेत. (Cotton Picking)

Cotton Picking :

आता शेतकऱ्यांना कापूस वेचणीचे वेग लागले. पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कपाशीकडून आशा आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना आता कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे तर काही ठिकाणी मजूरी जास्त द्यावी लागत आहे. 

आगर परिसरात कापूस वेचणीला प्रारंभ झाला असून, सर्वत्र सीता दही केल्या जात आहे. दुसरीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता कापसाला भाव किती मिळेल, याकडे लागले आहे.

खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला सततच्या पावसामुळे फटका बसला असून, शेतीला लावलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जुलै महिन्यात दमदार पावसाने थैमान घालत सतत दोन महिने उघडीप दिली नसल्याने शेतात पिकापेक्षा तण अधिक वाढले होते, तर सखल भागात पाणी साचले होते.

शेतकऱ्यांनी पिके वाचावीत, म्हणून शर्थीचे प्रयत्न करत तणाचा बंदोबस्त केला, असे असतानाही सोयाबीन पिकाला फारसा उपयोग झाला नाही. सोयाबीन पिकाला खर्च अधिक व उत्पादन कमी झाले आहे.

अशा शेतकऱ्यांना आंतर पीक असलेल्या तूर पिकावर आस आहे, तसेच कापूस वेचणीला प्रारंभ झाला असून, सीता दहीसाठी ३०० रुपये प्रमाणे मजुरीचे दर द्यावे लागत असल्याने कापसाला बाजारात भाव काय मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांची भिस्त आता कपाशीवर !

यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. काढणीचा खर्च वाढला असून, उताराही कमी लागत आहे. सोयाबीनला बाजारात भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा कपशीचे पिक जोमदार असल्याने आता शेतकऱ्यांना या पिकापासून अपेक्षा आहेत. योग्य भाव मिळाल्यास सोयाबीनची कमतरता भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

मजुरांसाठी शेतकरी मेटाकुटीला

गेवराई तालुक्यात सध्या कपाशीचे पीक जोमात आले असून, वेचणी सुरू झाली आहे. मात्र, कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजूर शोधण्याची वेळ आली आहे. महिला मजुरांना ने-आण करण्याकरिता रिक्षा लावून व ११ रुपये किलो दराने वेचणीची मजुरी देऊन घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.

गेवराई तालुक्यातील १३ महसूल मंडळांत यावर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे पिके जोरदार आली होती. सप्टेंबरमधील पावसामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले. यातच आता कापसाची वेचणी सुरू झाली आहे. 

वेचणीला मजूर महिलांना गावोगावी फिरावे लागत आहे. त्यामुळे मजूर महिला मिळणे कठीण होत आहे. मजूर महिलेला ११ रुपये किलो दराप्रमाणे वेचणीची मजुरी देऊन तसेच त्यांना ने-आण करण्याकरिता रिक्षा, वाहनांची सोय करून नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी परेशान झाला असल्याचे राजपिंबरी येथील शेतकरी देविदास भोसले यांनी सांगितले.

करावी लागते शोधाशोध

सध्या कापूस वेचणीला महिला मजूर मिळणे कठीण होत आहे. महिला मजुरांना ११ रुपये किलो दराने वेचणीचे पैसे देऊन त्यांना घरापासून ते शेतापर्यंत ने-आण करण्याकरिता रिक्षा लावून ने-आण करण्याची वेळ आल्याचे गौडगाव येथील शेतकरी सुनील देशमुख यांनी सांगितले, तर शेतकऱ्याला मजूर आणण्यासाठी गावोगावी फिरावे लागत असल्याचे अंतरवालीचे शेतकरी विजय शिनगारे यांनी सांगितले. 

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेतीकामगार