Join us

जिनिंग-प्रेसिंगच नसल्याने कापूस खरेदी रखडली, शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 4:11 PM

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात जिनिंग प्रेसिंग नाही. तसेच मोठा खरेदीदार व्यापारी नसल्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २००९ पासून कापूस ...

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात जिनिंग प्रेसिंग नाही. तसेच मोठा खरेदीदार व्यापारी नसल्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २००९ पासून कापूस खरेदी केली जात नाही. परिणामी, तालुक्यातील शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे.

अनेक वर्षांपासून कळमनुरी शहरात जिनिंग प्रेसिंग नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस बाजार समितीमार्फत खरेदी केला जात नाही. परिणामी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्नही बुडत आहे. तालुक्यात यावर्षी कापसाचा पेरा बन्यापैकी झाला आहे. शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे तालुक्यातील खरेदीदार व्यापायांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी केल्यास त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. व्यापायांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी करावा. काही अडचण आल्यास बाजार समितीस संपर्क साधण्याचे आवाहन एस. एल. गरड, सचिव, बाजार समिती  यांनी केले.

तालुक्यात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणावर होतो. मागील बऱ्याच दिवसांपासून तालुक्यातील कापूस परपेठेत विक्रीसाठी न्यावा लागत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी केल्या जात नाही. बाजार समितीत कापूस खरेदी केंद्र झाल्यास शेतकऱ्यांची सोय होईल.-दिगंबर कदम, शेतकरी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावे. कापूस खरेदी केंद्र नसल्यामुळे व्यापायांना कमी भावाने कापूस विकावा लागत आहे. परपेठेत कापूस विक्रीसाठी नेण्यासाठी जास्त खर्च लागतो. व्यापारीही कमी भावाने कापसाची खरेदी करतात. त्यामुळे येथे कापूस खरेदी केंद्र होणे गरजेचे आहे.- शेख पाशू, शेतकरी

कापूस दुसरीकडे विक्रीसाठी जात आहे. खरेदीदार हे गावागावात जाऊन कापूस खरेदी करून ते इतरत्र बाजारपेठेत नेतात. आधीच  खरिपाच्या पिकाची, अवर्षण, दुष्काळाची स्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळताना दिसत आहे.  त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यात जिनिंग प्रेसिंगच नसेल तर कापूस विकायचा कसा‌? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :कापूसशेतकरीहिंगोलीखरीप