Join us

Cotton Rates : कापसाला मिळतोय केवळ ६ हजारांचा दर! राज्यभरात हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:33 IST

Cotton Rates :  राज्यभरातील कापसाला व्यापाऱ्यांकडून कमी दर देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. 

Pune : राज्यभरात दसऱ्याच्या आसपास कापसाची बाजार समितीमध्ये आवक होत असते. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यातील कापूस मोठ्या प्रमाणावर बाजारात येऊ लागला आहे. पण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांना केवळ ६ हजार रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. खेडा खरेदीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांना अक्षरशः लुटत आहेत. 

दरम्यान, केंद्र सरकारने यंदा मध्यम धाग्याच्या कापसाला ७ हजार १२१ रूपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार ५२१ रूपये हमीभाव जाहीर केला आहे.  पण या हमीभावाने कुठेच कापसाची खरेदी होताना दिसत नाही. राज्यभरात केवळ ६ हजार ते ७ हजारांच्या दरम्यान दर मिळताना दिसत आहे. 

ऐन दिवाळीत कवडीमोल दराने कापूस विक्री करावा लागत असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर पाणी फेरले गेले आहे. कापूस अजून ओला असल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांकडून खेडा खरेदीमध्ये कापसाला कमी दर मिळत आहे. शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांनाही पर्याय राहिलेला नाही.

काय आहे कारण?सध्या बाजारात येणारा कापूस पावसामुळे भिजलेला आहे. यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे आणि आर्द्रतेमुळे कापासाचे वजन जास्त भरते या कारणांमुळे कापासाला कमी भाव देण्यात येतोय. पण प्रतिक्विंटल थेट १ हजार ५०० रूपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे शेतकरी ऐन दिवाळीत कोंडीत सापडला आहे.  

टॅग्स :कापूसकॉटन मार्केटशेतकरी