पुणे : शेतकऱ्यांनी खरिपाच्या लागवडीची तयारी केली असून कापूस बियाणे खरेदीची लगबग शेतकऱ्यांची सुरू आहे. दरम्यान, मागच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना कापसाच्या दरामुळे मोठा फटका बसला होता. केंद्र सरकारने कापसाच्या मध्यम धाग्यासाठी ६ हजार ६२० तर लांब धाग्यासाठी ७ हजार २० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर जाहीर केला होता. या दराचा विचार केला तर उत्पादन खर्चाच्या मानाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मागच्या दहा वर्षामध्ये कृषी निविष्ठांच्या किंमती वाढल्या आहेत त्यामुळे कापसासाठीचा उत्पादन खर्चसुद्धा वाढला आहे. महागाईमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे पण त्यातुलनेत हमीभावात जास्त काही फरक दिसत नाही. २०१४-१५ साली असलेल्या कापसाच्या हमीभावामध्ये प्रतिक्विंटल सरासरी केवळ ३ हजार रूपयांनी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
कापूस बियाणांची जास्त दरात विक्री
सध्या राज्यात कापूस बियाणांची जास्त दराने विक्री होताना दिसत आहे. केंद्र सरकारने बीजी - १ बियाणांसाठी ६३५ रूपये प्रतिपॅकेट आणि बीजी-२ बियाणांसाठी ८६४ रूपये प्रतिपॅकेट दर निश्चित केला असूनही दुकानदारांकडून जास्त दराने विक्री केली जात आहे. मात्र शेतकऱ्यांना जे बील दिलं जातं ते बील ८६४ रूपयांचं दिलं जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
२०१४-१५ सालापासून कापूस हमीभावात कशी झाली वाढ
वर्ष - लांब धाग्याच्या कापसासाठी हमीभाव (रूपये/प्रतिक्विंटल)
- २०१५-१६ - ४ हजार १०० रूपये
- २०१६-१७ - ४ हजार १६० रूपये
- २०१७-१८ - ४ हजार ३२० रूपये
- २०१८-१९ - ५ हजार ४५० रूपये
- २०१९-२० - ५ हजार ५५० रूपये
- २०२०-२१ - ५ हजार ८२५ रूपये
- २०२१-२२ - ६ हजार २५ रूपये
- २०२२-२३ - ६ हजार ३८० रूपये
- २०२३-२४ - ७ हजार २० रूपये