पसंतीचे कपाशीचे बियाणे (Cotton seeds) मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. त्यात बुधवारी कृषी विभागाने (Agriculture department) टाकलेल्या छाप्यात अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात ७५ हजार रुपयांचे बोगस बियाणे जप्त करून विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कृषी निविष्ठांच्या विक्रीत कुठेही गैरव्यवहार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासण्यांना वेग देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने अकोट तालुक्यातील उमरा येथे बुधवारी टाकलेल्या छाप्यात ७५ हजार रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. या विक्रेत्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोट तालुक्यातील उमरा येथील निर्मल दिलीपसिंग तोमर (ठाकूर) यांच्या शेतातील मोडकळीस आलेल्या घरात बोगस बियाणे असल्याबाबत गुप्त खबर जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार याठिकाणी २९ मे रोजी दुपारच्या सुमारास मोहीम अधिकारी महेंद्रकुमार साल्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, कृषी अधिकारी भरत चव्हाण व अकोट ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.
त्यात बोगस कापूस बियाण्याची ७५ हजार २०० रुपयांची एकूण ४७ पाकिटे जप्त करण्यात आली. निर्मल तोमर (ठाकूर) रा. उमरा ता. अकोट यांच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात बोगस बियाणे
पश्चिम वन्हाडात बोगस कापसाचे बीटी बियाणे आले असल्याचे 'लोकमत'ने एक महिन्यापूर्वीच प्रकाशित केले होते. अकोला (Akola) जिल्ह्यात बोगस खते, बियाणे व कीटकनाशक जप्त करण्यात आल्याचा इतिहास आहे. दरवर्षी असे प्रकार उजेडात येत असल्याचे समोर आलेले आहे.
बोगस 'एचटीबीटी' जिल्ह्यात विक्रीची शक्यता
एचटीबीटी कापूस ही बीटी कापसाची अनुवांशिकदृष्ट्या सुधारित, तणनाशक- सहिष्णू जात आहे. बीटी कापसाच्या विपरीत, एचटीबीटी कापसाची लागवड भारतात बेकायदेशीर आहे, असे असले तरी एचटीबीटीची लागवड होत असून, तणनाशक-सहिष्णू असल्याच्या नावाखाली बोगस बीटी बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे असे बियाणे बाजारात नसले तरी काही खासगी एजंटमार्फत विक्री केले जात आहे.
कृषी विभागाने टाकलेल्या धाडीत अकोट तालुक्यात ७५ हजार रुपयांचे ४७ बीटी कापसाचे बोगस बियाणे पाकीट जप्त करून विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, बोगस बीटी कापसाचे बियाणे विक्री होत असल्याची माहिती प्राप्त होताच कृषी विभागाला कळवावे. - सतीशकुमार दांडगे, कृषी अधिकारी, अकोला.