Join us

Cotton Seed : शेतकऱ्यांनो, कापसाच्या ठराविक वाणाचा आग्रह नको; कृषी विभागाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 8:49 PM

सध्या राज्यात एका खासगी कंपनीच्या वाणाच्या कापसाच्या बियाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पुणे : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत एका खासगी कंपनीच्या वाणाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अकोला, अमरावती, अकोट आणि विदर्भातील काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या गोंधळामुळे बियाणे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेऊन बंद पुकारला असल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, एकाच ठराविक वाणाची अपेक्षेपेक्षा जास्त मागणी शेतकऱ्यांकडून होत असून यामुळे बाजारात या वाणाची कमतरता भासत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली असून एकाच वाणाचा आग्रह सोडावा आणि इतर बीटी बियाणे सुद्धा बाजारात विक्रीसाठी आहेत, ते बियाणे खरेदी करावेत असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. 

महाराष्ट्र राज्यात कापूस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ४०.२० लाख हेक्टर आहे. कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार प्रति हेक्टर ४.२ पाकीटे बियाण्याची आवश्यकता असते. या क्षेत्राकरीता १ कोटी ७० लाख पाकिटाची आवश्यकता आहे. सर्व कंपन्यांचा आढावा घेतला असता साधारपणे १.७५ कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कापूस बियाण्याची कमतरता नाही असे स्पष्टीकरण कृषी विभागाकडून देण्यात आले.

"इतर बियाणेही चांगलेच"महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या काही वाणांना विशेष मागणी आहे. परंतु त्याबरोबर इतर कंपन्यांचे कापसाचे वाण सुध्दा अतिशय चांगले उत्पादन देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या ठराविक वाणांचीच मागणी करु नये याबाबत कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने खरीप २०२४ साठी कापूस BG II चा दर ८६४ रुपये निश्चित केला आहे. कापूस बियाणे जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र तसेच कापूस उत्पादक कंपनी यांचेवर कारवाई करण्याचे निर्देश संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) यांचे मार्फत आदेश देण्यात आलेले आहेत.

तसेच काही ठिकाणी कापूस जादा दराने विक्री केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कृषी विभागातील स्थानिक कृषी सहाय्यक यांच्या मदतीने संबंधित कापूस बियाण्याचे वाटप कृषि विभागाच्या कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन संबंधित जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केलेले आहे. कापूस बियाणे पाकीटाची जादा दराने विक्री केल्यामुळे जळगाव, धुळे व छत्रपती संभाजीनगर येथे विक्रेत्यांवर कृषि विभागामार्फत गुन्हे दाखल केले आहेत.

कुठे-कशी झाली कारवाई?महाराष्ट्र राज्यात एकूण एच.टी. बीटी कापूस बियाणेबाबत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी कारवाई करण्यात आल्या. त्यामध्ये ४५६८.३० किलो. बियाणे साठा जप्त करण्यात आला असून त्यांचे मुल्य रु ६६.८५ लाख इतके आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५५.३२ लाख किंमतीचे ३० क्विंटल. बियाणे जप्त करण्यात आले. तसेच नंदूरबार व धुळे जिल्ह्यांत तीन ठिकाणच्या कारवाईत १८०७ एच. टी. बीटी कापूस बियाणे पाकीट ३७.९६ लाख रु. किंमतीचा साठा जाप्त करण्यात आलेला आहे.

अमरावती विभागातील यवतमाळ जिल्हयांत तीन ठिकाणी ११३ बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली असून त्याचे मुल्य १.५५ लाख रूपये इतके आहे. सर्व जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर भरारी पथकांमार्फत मोहीम स्वरुपात तपासण्या करण्यात आल्या असून यानुषंगाने दोषीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीखते