अमरावती विभागाला पुरवठा होणाऱ्या ५७ लाख बीटी बियाणे पाकिटांच्या तुलनेत फक्त दीड टक्के प्रमाण असणाऱ्या विशिष्ट वाणाच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांमध्ये गर्दी होत आहे. या वाणाचा स्टॉक संपल्याने बियाणे बाजारात काळाबाजार होत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत.
कृषी विभागाने बियाण्याच्या ५६,९३,६०० पाकिटांची मागणी विविध कंपन्यांकडे केली. त्यापैकी ३१.७७ लाख पाकिटे उपलब्ध झाले आहेत.
बियाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर :
अकोल्यात विशिष्ट वानाच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांच्या कृषी निवाष्टा विक्रीच्या दुकानावर रांगा लागत आहेत. मंगळवारी शहरातील टिळक रोड परिसरातील एका दुकानावर बियाणे विक्री बंद असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
प्रतिबंधित कापूस बियाणे विक्रीप्रकरणी ३ जणांविरुद्ध गुन्हा
प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा विक्रीसाठी साठा करून ठेवल्याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे दोन, तर अनरद (ता. शहादा) येथे एक अशा तीन जणांविरुद्ध कृषी विभागाने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथे कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
बियाण्याच्या बाजारात पोशींद्याची लूट
अकोल्यात ८६४ चे पाकिट १४०० रुपयांत
अकोला जिल्ह्यातील अडसूळ (ता. तेल्हारा) येथील कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे जादा दराने विक्री होत असल्याने अश्विनी अॅग्रो एजन्सीचे प्रोप्रा. रामकृष्ण रामचंद्र पोहरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथकाने एका डमी ग्राहकाच्या माध्यमातून छापा टाकून प्रतिपाकीट ८६४ रुपये मूळ किंमत असलेले १४०० रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे रंगेहात पकडले.
जळगावात ८६४ चे बियाणे १२०० रुपयांत
बियाण्याची विक्री ठरलेल्या ८६४ रुपयांच्या किमतीत न करता, १,२०० रुपयांमध्ये करणे कृषी केंद्र चालकाला महागात पडले. गेल्या आठवड्यात कृषी विभागाच्या पथकाकडून जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील कृषी विक्रेत्याला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी मोहीम अधिकारी विजय पवार यांच्या फिर्यादीवरून सुशील विठ्ठल महाजन (रा. खर्ची, ता. एरंडोल) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.